लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : दिवाळी आणि इतर सणांनिमित्त मिळणाऱ्या सुट्टीची संधी साधून अनेक जण रेल्वेने बाहेरगावी जातात. परंतु अनेकांना आरक्षित तिकिट मिळत नाही. आरक्षित तिकिटे मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक दलाल रेल्वे परिसरात फिरत असून, प्रवाशांची लूट करतात. या दलालावर अकुंश ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने विविध मोहिमा हाती घेतल्या असून एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ कालावधीत २६९ प्रकरणी गुन्हे नोंद करून ३१७ दलालांना अटक करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी मोहीम आखली आहे. तसेच सायबर सेलकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे आरपीएफ पथक छापे टाकत आहे. मध्य रेल्वेच्या पाचही विभागांच्या आवारातील खासगी ट्रॅव्हल्स दलालांलवर छापे टाकण्यात आले. या कारवाईतून एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान २६९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तसेच रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत ३१७ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३.४२ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. मुंबई विभागात २६९ पैकी ९८ गुन्हे दाखल झाले असून ११७ दलालांना अटक करण्यात आली. त्याखालोखाल भुसावळ विभागात ७२ गुन्हे दाखल झाले असून ७७ जणांना अटक करण्यात आली. पुणे विभागातील आरपीएफने ५६ गुन्हे दाखल करून ७४ जणांना अटक करण्यात आली. नागपूर विभागात ३६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४१ जणांना अटक करण्यात आली. तसेच सोलापूर विभागात आठ गुन्हे दाखल करून आठ जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
आणखी वाचा-टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची लूट, मीटरनुसार भाडे आकारण्यास नकार
मध्य रेल्वेचे आरपीएफ आयटी सेल आणि कौशल्य विकास केंद्र प्रबळ आणि विविध सॉफ्टवेअरने सुसज्ज आहे. याद्वारे ऑनलाइन तिकीट दलालीचा शोध घेणे, सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे पाहणी करणे यांसह विविध अत्यावश्यक कामे करण्यात येतात. गेल्यावर्षी एप्रिल – ऑक्टोबर या कालावधीत आरपीएफने दलालीविषयक १७८ प्रकरणांची नोंद केली होती. या प्रकरणांमध्ये २०८ जणांना अटक करून ६.६४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला होता.
दरम्यान, दलालांकडून अनधिकृतपणे विकण्यात येणाऱ्या तिकिटांवर प्रवाशांना अधिकृत प्रवास करता येत नाही. त्यामुळे प्रवाशांनी कोणत्याही दलालांकडून तिकीट खरेदी करू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.