मुंबई: वांद्रे-वरळी सागरी सेतूवर झालेल्या अपघातानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सागरी सेतू शून्य अपघात रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सागरी सेतूवरील मनुष्यबळ वाढविण्यासह वेग नियंत्रक कॅमेऱ्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. तसेच सूचना फलकही वाढविण्यात येणार असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात पाच जणांचा मृत्यू झाला आणि दहा जण जखमी झाले. या भीषण अपघातानंतर सागरी सेतूच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने सागरी सेतू शून्य अपघात रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, इतर वरिष्ठ अधिकारी, वाहतूक पोलीस, टोल वसूली कंत्राटदार तसेच शून्य अपघात रस्ते यासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सागरी सेतूला शून्य अपघात रस्ता करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
गाडी वेगाने चालविणे, चुकीच्या दिशेने येणे, मद्यप्राशन करुन गाडी चालविणे, ओव्हरटेक करणे या आणि अशा अनेक कारणांमुळे मोठ्या संख्येने अपघात होतात. त्यामुळे सर्वप्रथम वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यासाठी आता वाहनचालकांवर करडी नजर ठेवण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यात येणार असून वेग नियंत्रक कॅमेऱ्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. वाहनचालकांमध्ये जनजागृतीही महत्त्वाची असल्याने त्यादृष्टीनेही प्रयत्न केले जाणार आहेत. सागरी सेतूवरील सूचना फलक वाढवून, ते स्पष्ट दिसतील अशा प्रकारे लावले जातील. सेव्ह लाईफ फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेची मदत शून्य रस्ते अपघातासाठी घेतली जाणार असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत मंगळवारी झालेल्या बैठकीत पुढे आलेल्या उपाययोजनांवर आधारीत एक नियमावली आता पुढील पंधरा दिवसांत तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा एक बैठक होईल आणि त्यात नियमावली, उपायोजना अंतिम करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.