ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या वरळी येथील लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलॅण्ड उदंचन केंद्रांचे काम संथगतीने सुरू असून ही कामे नियोजित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता धूसर बनली आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध कारवाईचे आदेश स्थायी अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले.
वरळी येथील लव्हग्रोव्ह संकुलात मलनि:स्सारण उदंचन केंद्र आणि वरळी कोळीवाडय़ात क्लिव्हलॅन्ड उदंचन केंद्र उभारण्यात येत आहे. लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलॅन्ड येथील उदंचन केंद्रांची कामे अनुक्रमे युनिटी आणि एम. अ‍ॅण्ड पी. के. कन्सोर्टियम या कंपन्यांना देण्यात आले आहे. या कामाचे कार्यादेश २३ नोव्हेंबर २०११ रोजी देण्यात आले. पावसाळा वगळता १५ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र आतापर्यंत लव्हग्रोव्ह येथील ३५ टक्के, तर क्लिव्हलॅन्ड येथील ५ टक्के काम पूर्ण झाले आहे. संथगतीने काम करणाऱ्या या दोन्ही कंपन्यांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. तसेच युनिटीला १० लाख तर एम. अ‍ॅण्ड पी. के. कन्सोर्टियमला १९ लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला. लव्हग्रोव्ह उदंचन केंद्राच्या कामामुळे रेसकोर्स नाला गाळात रुतल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच स्थायी समिती अध्यक्षांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर वरील आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा