स्वपक्षीयांना मात्र सरकारचे अभय

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर भाव(एफआरपी) न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा करणाऱ्या राज्य सरकारनेच आपल्या पक्षातील काही साखर सम्राटांच्या कारखान्याविरोधातील कारवाईत हस्तक्षेप केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याचप्रमाणे एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसै न देणाऱ्या १० साखर कारखान्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय गुरूवारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ऊस दर नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना ऊसदर न देणाऱ्या साखर कारखान्यांविरोधात फौजदारी कारवाई करून त्यांची साखर आणि मालमत्ता जप्त करण्याचा इशारा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वारंवार देऊनही राज्यातील १० साखर कारखान्यांनी सन २०१४-१५च्या गळीत हंगामातील एफआरपीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना दिलेले नसल्याचे आढळून आले आहे. या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे तब्बल ६७० कोटी रूपये अद्याप दिलेले नाहीत. त्यानुसार या कारखान्यांची शिल्लक साखर, मालमत्ता जप्त करण्याबरोबरच त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईही करण्यात येणार असल्याचे समजते. बैठकीत कारखान्यांचे मालक आणि संचालकांची खाजगी मालमत्ताही जप्त करावी आणि ती विकून शेतकऱ्यांचे पैसे देण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केल्याचे समजते.
एकीकडे शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या कारखान्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली असली तरी साखर आयुक्तालयाने सुरू केलेल्या या कारवाईत सरकार कडूनच हस्तक्षेप होत असल्याची बाबही या बैठकीत समोर आली. सोलापूचा आयर्न शुगर्स हा कारखाना राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा आणि माजी मंत्र्याचा असून त्यांच्या विरोधात वसुलीची कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी काढले. मात्र जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी हा कारवाई करण्याचे आपल्याला अधिकार आहेत का अशी विचारणा करीत पुढील कारवाई केली नाही. त्या दरम्यान साखर कारखान्याने उर्वरित साखर विकली. त्यामुळे या प्रकरणात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अशाच आणखी एका प्रकरणात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आलेल्या राष्ट्रवादीच्या एका माजी मंत्र्याच्या दोन कारखान्यांविरोधातील वसुलीत हस्तक्षेप करून सरकारने ही कारवाई रोखल्याबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.

’ज्या कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे पैसे दिलेले नाहीत त्यामध्ये कुंटूरकर शुगर्स(नांदेड), जयलक्ष्मी शुगर्स(उस्मानाबाद), कुमदा- रयत सहकारी साखरकारखाना(सातारा), आयर्न शुगर्स (सोलापूर), महाराष्ट्र शेतकरी शुगर्स(परभणी)
’माणगंगा सहकारी साखर कारखाना (सांगली), चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना(जळगाव), साईबाबा शुगर्स लि.(लातूर), साईकृपा शुगर युनिट २ (अहमदनगर) विजय शुगर मिल,करकंब( सोलापूर) विट्ठल सहकारी साखर कारखाना, पंढरपूर(सोलापूर) या कारखान्यांचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against factory due to frp not pay