मुलुंड पश्चिम येथे फेरीवाल्यांनी व्यापलेल्या आर. आर. टी. मार्गावरील सुमारे ३०० फेरीवाल्यांविरोधात पालिकेच्या टी विभागाने कारवाई करून संपूर्ण रस्ता मोकळा केला आहे. मुलुंड पश्चिम येथील स्टेशनलगत आर. आर. टी. मार्ग आणि जवाहरलाल नेहरू मार्ग लागतो. या मार्गावरून दुतर्फा बसलेल्या फेरीवाल्यांमुळे कशीबशी वाट काढत नोकरदार आणि नागरिकांना जावे लागते. महात्मा गांधी मार्गावरून येणाऱ्या रिक्षा आणि खासगी वाहने, तसेच या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी दुकाने चालवणाऱ्यांच्या रांगांनी आणि एकापुढे एक बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. यापूर्वीही अनेकदा फेरीवाल्यांविरोधात किरकोळ कारवाया करण्यात आल्या होत्या.
मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत आर. आर. टी. मार्गावरील फेरीवाल्यांनी सिमेंट काँक्रीट, लाकूड, विटा, पेव्हर ब्लॉक यांनी कायमस्वरूपी बनविलेले ठेले बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. त्याचबरोबर ५० दुकानदारांनी रस्त्यावर केलेली अतिक्रमणेही तोडून टाकली. यासाठी पालिकेच्या आठ वॉर्डातील १४ मालवाहू वाहने आणण्यात आली होती. त्यात फेरीवाल्यांचा जप्त माल भरण्यात आला यात विविध भाज्या, फळे खोके आणि तत्सम सामान होते. घनकचऱ्याच्या क्लीनअपच्या गाडय़ामध्ये घनकचरा, तर सुक्या कचऱ्यासाठीही गाडी ठेवण्यात आली होती. त्यामुळे कधी नव्हे तो हा मार्ग स्वच्छ आणि नीटनेटका आणि मोकळा दिसत होता.
स्टेशनपासून अगदी पी. के. रोडपर्यंत हा रस्ता आजच्या धडक कारवाईत मोकळा करण्यात आला आहे. आजची ही कारवाई मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याची भावना साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा