मुंबई : उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांवरून महानगरपालिकेला फटकारल्यानंतर शुक्रवारपासून मुंबईत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला सुरूवात झाली. या कारवाईसाठी महानगरपालिकेने २० महत्त्वाची ठिकाणे ठरवली आहेत. चर्चगेट, सीएसएमटी परिसर, कुलाबा, दादर स्थानक परिसर, अंधेरी, बोरिवली अशा महत्त्वाच्या ठिकाणांवरील कारवाईवर भर देण्यात येणार आहे. या कारवाईसाठी महानगरपालिकेने पथके तयार केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधानांसाठी पदपथ मोकळे होतात, तर सर्वसामान्यांसाठी का नाही, असा सवाल करीत दोनच दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकारला फटकारले होते. केवळ विचारमंथन करण्यात वेळ न दवडता ती सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचेही न्यायालयाने बजावले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलीस यांची संयुक्त बैठक महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात पार पडली. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईविषयी प्रथमच अशा संयुक्त उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यांवर कठोर करावी, पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे करावेत, मुंबई फेरीवालामुक्त करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले होते.

हेही वाचा >>>ईडीकडून मुंबई आणि जौनपूरमध्ये मालमत्ता जप्त; ४.१९ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त

आयुक्तांनी निर्देश दिल्यानुसार शुक्रवारपासून मुंबईत महानगरपालिकेच्या विविध विभाग कार्यालयांच्या हद्दीत कारवाईला सुरुवात झाली. अतिक्रमण निर्मूलन करताना अधिक परिणामकारकता आणि सातत्य ठेवावे लागणार आहे. केवळ दिवसाच नव्हे तर रात्री, तसेच शनिवार व रविवारदेखील नियमितपणे कारवाई केली पाहिजे. गर्दी, वर्दळीची ठिकाणे निश्चित करून सातत्याने कारवाई झाली पाहिजे, असे निर्देश आयुक्तांनी दिले होते. या कारवाईसाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पथके तयार केली आहेत. ही पथके रोज सकाळी ८ ते ४ आणि ३ ते ११ या वेळेत कारवाई करणार आहेत.

या कारवाईसाठी सुरूवातीला संपूर्ण मुंबईतील सर्वात गर्दीची अशी २० ठिकाणे निवडण्यात आली आहेत. शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील सर्वात र्गदीची रेल्वे स्थानके, फेरीवाल्यांची संख्या जास्त असलेली ठिकाणे याकरीता निवडण्यात आली आहेत. खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या दादर, बोरिवली स्थानकांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यातर दादर पश्चिम आणि दादर पूर्व, दादर टीटी याकरीता तीन वेगवेगळी पथके सज्ज करण्यात आली आहे. अन्य परिसरांमध्ये वांद्रे लिंकिंग रोड, मालाड, कांदिवलीतील मथुरादास रोड यांचा समावेश आहे.

उच्च न्यायालय परिसरातही कारवाई

दक्षिण मुंबईतील ए विभागातील तीन ठिकाणांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकापासून उच्च न्यायालयापर्यंतचा परिसर, चर्चगेट स्थानकापासून उच्च न्यायालयापर्यंतच्या परिसराचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. तसेच कुलाबा कॉजवे परिसराचाही त्यात समावेश आहे.

अन्य ठिकाणे

लालबागचा राजा परिसर, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, मालाड स्थानक पश्चिम, बोरिवली पश्चिम, भरुचा रोड दहिसर, कुर्ला पश्चिम, वांद्रे लिंकिंग रोड, हिल रोड, वांद्रे पश्चिम, घाटकोपर स्थानक (पूर्व आणि पश्चिम), कुर्ला, एल. टी. मार्ग, मोहम्मद अली रोड, एल. बी. एस. मार्ग, मुलुंड

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against hawkers in churchgate dadar andheri borivali mumbai print news amy
Show comments