लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेने मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र केली असून कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी विजेच्या खांबावरून अनधिकृतरित्या जोडणी घेतल्याचे निदर्शनास आले. या फेरीवाल्यांवर महापालिकेने सोमवारी कारवाईचा बडगा उगारला. दादर रेल्वे स्थानक परिसर, भायखळा, चेंबूर, बोरिवली, मुलुंड आणि अंधेरी परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करून अनधिकृत वीज जोडणी खंडित करण्यात आली. तसेच, या कारवाईदरम्यान फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी करण्याचे, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. मुंबईकरांच्या सोयीसाठी महानगरपालिका प्रशासनाने पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणारे फेरीवाले तसेच उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा-मुंबई : मोटारीवर उड्डाणपुलाच्या छताचा भाग कोसळला, सुदैवाने कोणीही जखमी नाही

मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम ६१ (न) नुसार सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्तीची व्यवस्था करणे, सुस्थितीत ठेवणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्ती करण्यात आली आहे. मात्र याच वीज खांब्यांवरून बेकायदा फेरीवाल्यांनी अनधिकृतरित्या वीजजोडणी घेतल्याचे निदर्शनास आले. तसेच, या जोडणीवर विक्रेते मोठमोठे दिवे, प्रखेर झोताचे दिवे लावत आहेत. शहर विभागात बेस्ट, तर उपनगरांमध्ये अदानी एनर्जी लिमिटेड या वीज कंपनीकडून वीज पुरवठा करण्यात येतो.

अनधिकृत फेरीवाल्यांनी जवळच्या वीज खांब्यावरून, जोडणी पेटीतून (कनेक्शन बॉक्स) अनधिकृतरित्या वीज जोडणी घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर महानगरपालिका आणि मे. अदानी एनर्जी लिमिटेड यांच्या पथकाने संयुक्तरित्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. तसेच, त्यांच्या अनधिकृत वीज जोडण्याही काढून टाकण्यात आल्या. या धडक कारवाईत महानगरपालिका, बेस्ट आणि वीज कंपनीचे पथक सहभागी झाले होते.

आणखी वाचा-अंधेरी सहार येथे मुख्य जलवाहिनी खचली, पाण्याच्या चावीचा भाग खचला

विशेष पथकांद्वारे कारवाई सुरू राहणार

वीजचोरी करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई करावी यासाठी महानगरपालिका प्रशासन विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रमाला पत्र पाठविणार आहे. असे प्रकार रोखण्यासाठी बेस्टने मोहीम हाती घ्यावी. तसेच अशा फेरीवाल्यांवर पोलिसांत गुन्हे नोंदवावा, असेही बेस्टला सांगण्यात येणार आहे. पालिकेतील सर्व विभाग कार्यालयांतही विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. या पथकात सहायक अभियंत्यांचा समोवश असणार आहे. विभाग कार्यालयाच्या हद्दीतील अनधिकृत फेरीवाले, वीजचोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची जबाबदारी या पथकावर सोपविण्यात येणार आहे.