विरुद्ध दिशेने वाहने हाकणाऱ्या सहा लाख जणांवर दोन वर्षांत कारवाई; मुंबईत चार महिन्यांत २६ हजार प्रकरणांची नोंद
सुशांत मोरे, मुंबई
एकेरी रस्ते किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याच्या प्रकारांमुळे होणाऱ्या अपघातांवर चिंता व्यक्त होत असताना, वाहनचालक सर्रासपणे अशा प्रकारे ‘उलट प्रवास’ करत असल्याचे समोर येत आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यभरात अशा तब्बल सहा लाख ८० हजार ४३ प्रकरणांची नोंद महामार्ग पोलिसांनी केली आहे. विशेष म्हणजे, यात मुंबई आणि ठाणे ही शहरे आघाडीवर आहेत. मुंबईतच यावर्षी जानेवारी ते एप्रिलदरम्यान अशा २६ हजार ४१४ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.
ज्या रस्त्यांवर फक्त एकेरी दिशेने जाणाऱ्या वाहनांना परवानगी आहे, अशा रस्त्यांवर विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचे प्रकार घडत आहेत. त्या वाहनचालकांविरोधात कारवाई करूनही त्याचे प्रमाण कमी होत नसल्याने चार महिन्यांपूर्वी याची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली आणि हा वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात जास्तीत जास्त दंडाची कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
अशा प्रकारे वाहतूक नियम मोडल्याच्या ३ लाख ३९ हजार ९२७ प्रकरणांची २०१७मध्ये नोंद झाली. २०१८ मध्ये हाच आकडा २ लाख ६४ हजार १६७ पर्यंत नोंदवण्यात आला तर, यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत राज्यभरात ७५ हजार ९४९ प्रकरणांची नोंद करण्यात आली. यात मुंबईतील प्रकरणांचे प्रमाण अधिक आहे. मुंबईत २०१९ मध्ये २६ हजार ४१४ प्रकरणे दाखल झाली असून त्यापाठोपाठ ठाणे शहरात १६ हजार ७२, पिंपरी-चिंचवडमध्ये १६ हजार ४२२ आणि नागपूर शहरातही ९ हजार ८७३ प्रकरणांची नोंद आहे.
द्रुतगती महामार्गावरही सर्रास उल्लंघन
मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर मनाई असतानाही विरुद्ध दिशेने धोकादायकरीत्या प्रवास केला जात आहे. २०१८ मध्ये अशी १०१ प्रकरणे आढळली होती. मात्र, यावर्षी अवघ्या चार महिन्यांत त्यांची संख्या २७७वर पोहोचली आहे. या दोन्ही वर्षांत पोलिसांनी ८२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. महामार्गालगत असलेल्या गावांतील ग्रामस्थांकडून अशी उलट वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
राज्यात एकेरी रस्त्यांवर परवानगी नसतानाही विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचे प्रकार काही चालक करतात. सर्वोच्च न्यायालयाने या चालकांविरोधात वाहतूक नियम मोडण्याचे कलम लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार यापूर्वी आकारण्यात येणाऱ्या २०० रुपये दंडाऐवजी आता एक हजार रुपये दंडाप्रमाणे कारवाई केली जात आहे.
– विजय पाटील, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस (मुख्यालय)
दंडात वाढ
विरुद्ध दिशेने वाहन हाकणाऱ्या चालकांकडून सुरुवातीला २०० रुपये दंड वसूल केला जात होता. आता ही रक्कम एक हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. राज्यभरातून गेल्या चार महिन्यांत १ कोटी २२ लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.