प्रसाद रावकर
मुंबई : केंद्रीय प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांची पूर्वकल्पना दिल्यानंतरही मुंबईत प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) घरगुती गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांवर न्यायालयात खटला दाखल करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या स्तरावर पथके स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून ही पथके ठिकठिकाणच्या गणेश कार्यशाळांची पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मूर्तिकारांची यादी तयार करणार आहे.
पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या पीओपीच्या वापरावर केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने बंदी घातली आहे. दरवर्षी पीओपीपासून मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती घडवण्यात येतात. या मूर्तींच्या विसर्जनानंतर जैवविविधतेला धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय प्रदुषण नियमंत्रम मंडळाने २०१० मध्ये पीओपीपासून गणेशमूर्ती साकारण्यावर बंदी घालण्याबाबत मार्गदर्शक तत्वे तयार केली होती. मात्र त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकली नाही. दरम्यानच्या काळात पीओपी बंदीचे प्रकरण न्यायप्रवीष्ट झाले असून पीओपी बंदीचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते. मुंबईमध्ये या आदेशांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेवर होती. मात्र करोना संसर्गामुळे २०२० मध्ये या बंदी आदेशांना मुदतवाढ देण्यात आली. त्यांतर २०२२ मध्ये मूर्तिकारांनी आधीच पीओपीपासून मूर्ती साकरल्या होत्या. मूर्तिकारांचे नुकसान होऊ नये म्हणून पुन्हा एकदा मुदतवाढ द्यावी लागली होती. मात्र आता मुंबईत टप्प्याटप्प्याने पीओपी बंदीच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
हेही वाचा >>>मुंबई: मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडात २७ टक्क्यांची घट
यंदापासून घरगुती गणेशमूर्ती शाडूच्या मातीपासूनच साकारण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच चार फुटांहून अधिक उंचीच्या गणेशमू्र्ती पीओपीपासून घडविण्यास मुभा देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी आयोजित केलेल्या बैठकांमध्ये बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीसह अन्य संघटना, मूर्तिकारांची संघटना, मूर्तिकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधीं पीओपीच्या मूर्तींवरील निर्बंधांची कल्पना दिली आहे.
हेही वाचा >>>मुंबईत पुढील दोन तासांत मुसळधार पावसाची शक्यता
येत्या १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असून मूर्तिकारांनी मूर्तिकामाला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी मंडप उभारून गणेशमूर्ती साकारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र मुंबईमधील काही दुकानांमध्ये, मूर्तिकारांच्या मंडपांमध्ये पीओपीपासून घडविलेल्या एक-दोन फुटांच्या गणेशमूर्ती दिसू लागल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने निर्बंध धुडकावून पीओपीपासून घरगुती गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकाराविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्या मूर्तिकारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये पथके सज्ज करण्यात येत आहेत. ही पथके मुंबईमधील गणेश कार्यशाळांची पाहणी करणार आहेत. पीओपीपासून घडविलेली घरगुती गणेशमूर्ती आढळल्यानंतर कार्यशाळा, मूर्तिकाराचे नाव आदींची यादी तयार करण्यात येणार आहे. या यादीत समाविष्ट मूर्तिकारांविरोधात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून न्यायालयात खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.