मुंबई : गोरेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाईने वेग घेतला आहे. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागात वरिष्ठ निरिक्षक असलेल्या नूतन जाधव या महिला अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे या परिसरात फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र तरीही नूतन जाधव यांच्यावर समाजमाध्यमांवरून टीका होऊ लागली आहे. कारवाई करीत असताना रील तयार करून ते समाजमाध्यमांवर टाकण्याच्या सवयीमुळे त्या वादात सापडल्या आहेत. जाधव यांनी मात्र या सगळ्या आरोपांचे खंडन केले आहे.
समाजमाध्यमांवर तरुण मुलेमुली रील्स टाकतात तशाच रील्स टाकल्यामुळे गोरेगावमधील पालिकेच्या एक अधिकारी चर्चेत आल्या आहेत. आधुनिक कपडे घालणाऱ्या नूतन जाधव यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे त्यांच्यावर अनेकदा समाजमाध्यमांवर कौतुकाचा वर्षाव होत असतो. तर कधी त्यांना टोकाची टीकाही सोसावी लागते. ५७ वर्षांच्या नूतन जाधव या अतिक्रमण निर्मूलन विभागात काम करतात. फेरीवाल्यांच्या गाड्या हटवणाऱ्या, अनधिकृत बांधकाम पाडणाऱ्या पथकासह उन्हातान्हात काम करतात. मात्र त्यांच्या कपड्यांवरून आणि रिल बनवण्यावरून समाजमाध्यमावर टीका होत आहे. नूतन यांचे कपडे हे शासन नियमाप्रमाणे आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अधिवेशन काळात रीलस्टार अधिकाऱ्यांवर कारवाई करू असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे तरीही या मॅडमवर का कारवाई होत नाही असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने समाज माध्यमांवर उपस्थित केला आहे.
नूतन यांनी आरोप फेटाळले
नूतन यांनी हे सगळे आरोप फेटाळतानाच त्यांचे खंडनही केले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी कोणते कपडे घालावेत याबाबत कोणताही ड्रेस कोड नाही. फक्त पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करायला हवेत. मी शर्ट आणि जिन्स आधीपासूनच घालते. नोकरी करायला लागल्यापासून मी हे कपडे घालते. अनिकृत बांधकाम तोडायला जाताना साडी आणि ओढणी घेऊन जाऊ शकत नाही. रिल्स बनवण्याबाबत अधिवेशनात चर्चा झाली पण त्याबाबतचे कोणतेही परिपत्रक आलेले नाही मात्र तरीही आपण रिल्स बनवणे तेव्हापासून बंद केले आहे, असे त्यांनी सांगितले.
रिल्स बनवण्यामगे चांगलाच उद्देश
मुंबई महापालिका अनधिकृत बांधकाम हटवत नाही असा आरोप होत असतो. आम्ही फेरीवाल्यांना हटवले की दुसऱ्या दिवशी पुन्हा फेरीवाले तेथे येतात. पण आम्ही केलेले काम नागरिकांना दिसत नाही. आम्ही उन्हातान्हात काम करतो. लोकांची बोलणी खातो, लोक शिव्याशाप देतात. कधीकधी पोलिसांचे संरक्षणही मिळत नाही. आम्ही फेरीवाल्यांना हटवतो, त्यांचे चार चाकी अवजड गाड्या उचलून टाकतो. हे लोकांना कळावे म्हणून रिल्स बनवल्या होत्या. रिल्स बघून कौतुक करणारेही खूप आहेत, असे जाधव यांनी सांगितले.