वारंवार सूचना केल्यानंतरही परवान्याशिवाय अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या वांद्रे – कुर्ला संकुलातील मे. वी वर्क इंडिया मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली. याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम १८८, तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम ५५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात संबंधित आस्थापनेच्या प्रशासनाविरोधात तक्रार करण्यात आली. वांद्रे – कुर्ला संकुलातील मे. वी वर्क इंडिया मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या सी-२०, जी ब्लॉक या १६ मजली इमारतीमधील कार्यालयांवर ७ फेब्रुवारी रोजी अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली होती.

हेही वाचा >>> कृष्ण धवल रंगात ‘भीड’णार टाळेबंदीचे दाहक वास्तव

यावेळी इमारतीमधील काही मजल्यांवर फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ साठविलेले आणि कॉफी वेंडिंग यंत्र आढळून आले होते. मात्र खाद्यपदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी मे. वी वर्क इंडिया मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने आवश्यक अन्न परवाना घेतला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने या आस्थापनेला नोटीस देऊन परवाना घेईपर्यंत अन्नपदार्थाशी निगडीत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर फोस्कॉस या त्रयस्थ संस्थेमार्फत १७ फेब्रुवारी रोजी या आस्थापनेची तपासणी करण्यात आली. त्यावेळी या आस्थापनेत अन्नपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले होते.

हेही वाचा >>> जलतरण तलावाच्या शुल्कात महिलांना २५ टक्के सवलत; जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेची भेट

या आस्थापनेस २७ फेब्रुवारी रोजी देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी पंच, साक्षीदार व अन्न परिमंडळ ५ चे सहाय्यक आयुक्त एस. एस. जाधव यांच्या समवेत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संबंधित इमारतीला पुन्हा भेट दिली. त्यावेळीही सदर आस्थापनेत अन्नपदार्थांची विक्री सुरू असल्याचे आढळून आले. वारंवार निर्देश दिल्यानंतरही मे. वी वर्क इंडिया मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने अन्न परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवल्यामुळे त्यांच्याविरुद्ध बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ही कारवाई ‘परिमंडळ ५’चे सहायक आयुक्त (अन्न) एस. एस. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी  व. रु. आडे यांनी केली.