मुंबई : राज्यातील २०२१-२२ पर्यंत नोंदणीकृत डॉक्टरांची नोंदणी करण्यास महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला अपयश आल्याचा ठपका कॅगकडून ठेवण्यात आला. मात्र, राज्यातील १ लाख ४० हजार डॉक्टरांची नोंदणी पूर्ण करण्यात आली असून, ज्या डॉक्टरांनी नोंदणीचे नूतनीकरण केले नाही, अशा डॉक्टरांना या नववर्षात कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण न करणाऱ्या डॉक्टरांवर बोगस डॉक्टर म्हणून कारवाई केली जाणार असल्याचे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने स्पष्ट केले आहे.
राज्यामध्ये २०२१-२२ पर्यंत डॉक्टरांची नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ६८ हजार ६६५ डॉक्टरांच्या नोंदणीचे नूतनीकरण होणे अपेक्षित होते. मात्र मे २०२२ पर्यंत त्यांच्या नोंदणीचे नूतनीकरण झाले नसल्याने नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिकांची नोंदवही नियमितपणे अद्ययावत केली जात नसल्याचा ठपका लेखापरीक्षण अहवालामध्ये ठेवण्यात आला आहे. मात्र अधिकाधिक डॉक्टरांची नोंदणी व त्यांच्या नोंदणीचे नूतनीकरण व्हावे, यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मागील वर्षभरात ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील १ लाख ९० हजार डॉक्टरांपैकी १ लाख ४० हजार डॉक्टरांची नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंदणी करण्यात आली. अद्यापपर्यंत नोंदणी न झालेल्या डॉक्टरांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. या डॉक्टरांनी तातडीने नोंदणी न केल्यास नववर्षामध्ये त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नोंदणी नसलेल्या डॉक्टरांवर बोगस डॉक्टर म्हणून कारवाई केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी दिली.
हेही वाचा – मुंबईतील रस्ते आणखी चकचकीत, मार्चपर्यंत १५ यांत्रिकी झाडू, कचरा उचलणारी यंत्रे घनकचरा विभागाच्या ताफ्यात
क्यूआर कोडवर डॉक्टरची माहिती उपलब्धनोंदणी केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून एक क्यूआर कोड देण्यात आला आहे. हा क्यूआर कोड त्यांना त्यांच्या क्लिनिकच्या बाहेर लावायचा आहे. जेणेकरून क्लिनिकमध्ये येणारा रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकाने त्याच्या मोबाइलद्वारे हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर त्यांना डॉक्टरची सर्व माहिती सविस्तर उपलब्ध होणार आहे. यामुळे उपचार घेत असलेल्या डॉक्टरची सर्व माहिती उपलब्ध होण्याबरोबरच बोगस डॉक्टरांना आळा घालणे शक्य होणार आहे.
हेही वाचा – राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्तनपान कक्ष बांधणार, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ७० कक्ष साकारणार
नोंदणीचे नूतनीकरण न होण्याची कारणे
नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंदणी झालेल्या काही डॉक्टरांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांनी नोंदणी केलेली नाही. तसेच काही नोंदणीकृत डॉक्टर हे विविध कामासाठी किंवा वैद्यकीय कामासाठी परदेशात गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अद्यापपर्यंत नोंदणीचे नूतनीकरण करण्यात आले नसल्याचे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले.