मुंबई : मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पालिकेने कठोर कारवाई सुरू केली आहे. बांधकाम, पाडकामाचा राडारोडा वाहून नेताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून गेल्या तीन दिवसांत तब्बल ४ लाख ७१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबई महानगरातील वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी महानगरपालिकेने नियमावली तयार केली आहे. ती बांधकाम व्यावसायिक, तसेच शासकीय व खाजगी बांधकामांसाठी लागू आहे. राडारोडा वाहून नेणाऱ्यांसाठीही पालिकेने नियमावली तयार केली आहे. सर्व संबंधित यंत्रणांसाठी मार्गदर्शक तत्वांचे पालन अनिवार्य असून ते न करणाऱ्या संबंधितांवर कारवाईचा इशारा महानगरपालिकेने दिला आहे.
हेही वाचा – मेट्रो ७ अ मार्गिकेतील दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाला सुरुवात
बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकलेली असावीत असा नियम पालिकेने केला आहे. जेणेकरून वाहतुकीदरम्यान धूळ हवेत मिसळणार नाही. वाहनातून मर्यादेपेक्षा अधिक वजनाचे साहित्य वाहून नेऊ नये, जेणेकरून वाहतुकीदरम्यान ते पडण्याचा धोका राहणार नाही. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी, परिसरात निर्माण होणारा राडारोडा हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम व पाडकाम मलबा व्यवस्थापन आराखड्यानुसार, निर्देशित केलेल्या ठिकाणीच नेला जावा. राडारोडा उतरवल्यानंतर, वाहन पूर्णपणे धुऊन स्वच्छ करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांनी या कामी भरारी पथके स्थापन केली असून राडारोडा वाहून नेताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध वाहनांवर दंडात्मक कारवाई करून एकूण ४ लाख ७१ हजार ६९२ रुपयांचा दंड तीन दिवसांत वसूल करण्यात आला आहे.
त्यात वरळी प्रभादेवी परिसरात १५ हजार रुपये, मालाड परिसरात ८० हजार रुपये, घाटकोपर, विद्याविहार विभागात ७० हजार रुपये, भांडूप विभागात ४५ हजार ६९२ रुपये, मुलुंड विभागात ५० हजार रुपये, गोरेगाव विभागात १३ हजार रुपये, अंधेरी, जोगेश्वरी विभागात १० हजार रुपये, वडाळा, सायन विभागात ४५ हजार रुपये, दादर, माहीम, धारावी विभागात १० हजार रुपये असा एकूण ४ लाख ७१ हजार ६९२ रुपयांचा दंड रकमेचा समावेश आहे.
परिमंडळ निहाय दंड रकमेची आकडेवारी
परिमंडळ १ – निरंक
परिमंडळ २ – ७० हजार रुपये
परिमंडळ ३ – ५३ हजार ५०० रुपये
परिमंडळ ४ – १ लाख ३ हजार रुपये
परिमंडळ ५ – ५६ हजार ५०० रुपये
परिमंडळ ६ – १ लाख ६३ हजार ६९२ रुपये
परिमंडळ ७ – २५ हजार रुपये