राज्यात मुंबई, ठाणे, पुणे नाशिकमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बांधकाम उद्योगात त्यांचा मजूर म्हणून राबता मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे बांधकाम वा अन्य उद्योगात बांगलदेशी घुसखोरांना कामावर ठेवणाऱ्या बिल्डर वा उद्योजक तसेच शासकीय अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.
नवी मुंबईत बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्याबाबत एकनाथ खडसे, योगेश सागर आदींनी लक्षवेधी मांडली होती. गेल्या तीन वर्षांत ७,६९८ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यापैकी ३ हजार लोकांना हद्दपार करण्यात आले आहे. तसेच नवी मुंबईतील घटनेत १५ आरोपींना अटक  करण्यात आली आहे. बांगलादेशी घुसखोरांना हुडकून काढण्यासाठी स्वतंत्र आय सेलची स्थापना करण्यात आली असून त्यांना राज्यात कोणत्याही ठिकाणी कारवाई करण्याची मुभा देण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच बांधकाम व्यवसाय तेजीत असलेल्या मुंबई आणि परिसरातील शहरे, पुणे, नाशिक आदी शहरांमध्ये बांधकाम मजूर म्हणून बांगलादेशीयांची संख्या अधिक असून काहींनी खोटय़ा कागदपत्रांच्या आधारे शिधापत्रिका, पॅनकार्ड, लायसन्स, सीमकार्ड मिळविले असल्याचेही पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. तसेच यापुढे बांगलादेशी घुसखोरांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader