सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ‘पारदर्शकते’चा नियम पायदळी तुडवत वाहनांवर काळ्या काचा मिरविणारे शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना सोमवारी ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी चांगलाच हिसका दिला. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हानगर, बदलापूर अशा जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांमधील महापालिका-नगरपालिका तसेच शासकीय कार्यालयांमध्ये धडक देत पोलिसांनी बडय़ा अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील काचांना बसविण्यात आलेल्या काळ्या फिल्म उतरवल्या. ठाणे महापालिकेत कामानिमित्त आलेले शिक्षक आमदार रामनाथ मोते, महापालिकेतील विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांच्यासह काही बडय़ा पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवरही पोलिसांनी या वेळी कारवाई केली. ठाण्याचे महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या वाहनाकडेही पोलिसांनी मोर्चा वळविला होता. मात्र, काचांवरील काळ्या फिल्म उतरविण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त कार्यालयाकडून मिळताच पोलिसांनी राजीव यांच्या वाहनावरील कारवाई पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाचा पारदर्शक काचांचा आदेश पायदळी तुडविणाऱ्या शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींमुळे वाहतूक पोलिसांवर टीका होऊ लागली होती. त्यामुळे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी वाहनांवर काळ्या काचा लावून मिरविणाऱ्या शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींविरोधात विशेष मोहीम हाती घेतली. त्यासाठी विशेष पथके करण्यात आली होती. या पथकांनी सोमवारी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका-नगरपालिका तसेच इतर शासकीय कार्यालयामध्ये धडक दिली. तसेच तेथील वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरील काळ्या काचांवर पथकाने कारवाई केली.  यामध्ये सुमारे ११८ शासकीय वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच इतर अधिकाऱ्यांच्या वाहनांचा समावेश आहे. तसेच सुमारे पाचशे निमशासकीय वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शासकीय कार्यालय, महापालिका तसेच नगरपालिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.