डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रतिजैविक (अ‍ॅण्टीबायोटिक) औषधांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधे देणाऱ्या राज्यभरातील ४३ विक्रेत्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यात मुंबईतील अपोलो फार्मसी, जेनरिको, मेट्रो मेडिकल यांच्या दुकानांचाही समावेश आहे.

शरीरातील विषाणूंचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसल्यास प्रतिजैविक औषधांचा वापर करणे आवश्यक असते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट औषधांच्या दुकानातून अशी औषधे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रतिजैविक औषधांची विक्री करणे बेकायदा आहे. औषध विक्रेत्यांकडून विनाचिठ्ठी औषधविक्री केली जाते का, याची पडताळणी करण्यासाठी गेल्या महिनाभरात प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाने राज्यभरातील काही किरकोळ औषध दुकानांच्या तपासण्या केल्या. यात मुंबई (१३), कोकण विभाग (६), पुणे (८), नाशिक (५), औरंगाबाद (५), नागपूर (६) विभागांतील एकूण ४३ औषधविक्रेते या औषधांची बेकायदा विक्री करत असल्याचे दिसून आले. या विक्रेत्यांना औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम १९४५ अंतर्गत नियम ६५ च्या तरतुदीचा भंग केल्याप्रकरणी प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे.

प्रतिजैविकांच्या अतिवापरामुळे आरोग्याला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे त्यास पायंबद घालण्यासाठी प्रतिजैविकांचा वैद्यकीय सल्ल्याशिवाय सुरू असलेला वापर रोखणे आवश्यक आहे. जून महिन्यात सुरू केलेली ही मोहीम या महिन्यातही सुरू राहणार आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशा औषधांची विक्री करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिला आहे.

प्रतिजैविक औषधे विशिष्ट मात्रेत घेणे आवश्यक असते. त्याच्या अतिवापराचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानंतरच अशी औषधे घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांनीही या औषधांचा योग्य वापर होईल, असे पाहायला हवे.

-डॉ. ललितकुमार आनंदे, वैद्यकीय अधिष्ठाता, क्षयरोग रुग्णालय

Story img Loader