तिसऱ्यांदा पत्र पाठवूनही ‘तंत्रशिक्षण परिषद’ निष्क्रिय
महाराष्ट्रातील ३४६ अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’च्या (एआयसीटीई) नियम व निकषांचे पालन होते अथवा नाही याची सखोल चौकशी करून ‘एआसीटीई’ला अहवाल पाठविण्यात आले आहेत. चौकशी केलेल्या बहुतेक महाविद्यालयांमध्ये निकषांची पूर्तता होत नसल्याचे दिसून येत असून अशा महाविद्यालयांवर शिखर संस्था म्हणून आपण तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीच आता राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्याकडे केली आहे.
राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. सु. का. महाजन यांनी ११ फेब्रुवारी २०१६ रोजी ‘एआयसीटीई’च्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात बहुतेक महाविद्यालयांनी आपल्याकडे कोणतीही त्रुटी नसल्याची खोटी माहिती ‘एआयसीटीई’ला दिल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. ज्या महाविद्यालयांनी ‘एआयसीटीई’ची वर्षांनुवर्षे फसवणूक केली आहे त्यांच्याविषयाच्या तक्रारी २०१०-११ पासून सातत्याने ‘सिटिझन फोरम’सह अनेक संस्थांनी आपल्याकडे केलेल्या आहेत. ‘एआयसीटीई’च्या उच्चाधिकार समितीने केलेल्या चौकशीतही यातील अनेक महाविद्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात त्रुटी असून त्यांनी खोटी माहिती दिल्याचे उघडकीस आले आहे. बहुतेक महाविद्यालयात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तसेच अपुरी जागा आणि नियमानुसार बांधकाम नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे २०१०-११ पासून ‘एआयसीटीई’ला खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांवर तुम्ही नियमानुसार तात्काळ कडक कारवाई करावी, असे डॉ. महाजन यांनी पत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे २०१६-१७ सालासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता विस्तार परवानगी (एक्सटेंन्शन ऑफ अॅप्रुव्हल) देताना ‘एआयसीटीई’च्या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा आपणही करून ध्यावी, असेही डॉ. सहस्रबुद्धे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने घोटाळेबाज महाविद्यालयांवर कारवाई करण्यासंदर्भात ‘एआयसीटीई’ला आतापर्यंत तीनदा पत्र पाठवले असून शिखर संस्थेला तसेच संबंधित महाविद्यालयांनाच याप्रकरणी कारवाई करण्याचा थेट अधिकार असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले. यापुढे या महाविद्यालयांची संखोल चौकशी करूनच विद्यापीठांनी ‘स्थानीय चौकशी अहवाल’ तयार करावे तसेच ते विद्यापीठांच्या वेबसाइटवर सर्वासाठी खुले ठेवावे यासाठी विद्यापीठांकडे पाठपुरावा केला जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांनी सांगितले.
काही अभियांत्रिकी महाविद्यालये व त्यांचे प्राचार्य गेली अनेक वर्षे ‘एआयसीटीई’ची उघड उघड फसवणूक करत असतानाही देशातील ही सर्वोच्च शिखर संस्था कोणतीही ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरली आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता नव्याने अध्यक्ष झालेले डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांना याबाबत विचारले असता काही महाविद्यालयांबाबतचा योग्य तपशील ‘डीटीई’कडून मिळालेला नसून खोटी माहिती देणाऱ्या सर्वच महाविद्यालयांची प्रकरणे तपासण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.