मुंबईतील विविध पदपथांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर महापालिका व पोलिसांनी धडक कारवाई सुरू केल्याने दररोज फळ-भाजी-कांदा घाऊक बाजारात येणाऱ्या हजारो किरकोळ विक्रेत्यांनी पाठ फिरविली आहे. या मालाला सध्या उठाव नसल्याने व्यापाऱ्यांनी शेतमाल कमी पाठविण्याची विनंती शेतकऱ्यांना केली आहे. त्यामुळे बाजारातील आवक घटली असून मुंबईतील या कारवाईची झळ आता थेट शेतकऱ्यांना बसू लागली आहे. दरम्यान भाज्यांची आवक चांगली असली तरी त्यांचे भाव घटले आहेत.  
मुंबईत पदपथावर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी दंडुका उगारल्यावर महापालिकेच्याही अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव झाली असून फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या सकाळ-संध्याकाळ फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. या कारवाईची रक्कमही जास्त असल्याने कारवाईपेक्षा धंदाही नको अशी मानसिकता किरकोळ विक्रेत्यांची झाली आहे. काही विक्रेत्यांनी तर धंदा बंद केला आहे. त्याचा अप्रत्यक्ष पारिणाम राज्यातील शेतकऱ्यांचा शेतमालावर झाला आहे.
मुंबईतील कानाकोपऱ्यात ४० हजार फेरीवाले फळ, भाजी व कांदा,बटाटा, लसूण विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी पालिका व पोलिस कारवाईचा धसका घेऊन व्यवसायाला तूर्तास टाळे ठोकले आहे तर काहीजणांनी माल कमी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील एपीएमसीच्या घाऊक बाजारपेठेत दररोज पहाटे तीन वाजल्यापासून सुरू होणारी किरकोळ विक्रेत्यांनी वर्दळ मंदावली आहे. या मालांना उठाव नसल्याने व्यापाऱ्यांनी फळ, भाजी, कांदा, बटाटा, कमी पाठविण्याची विनंती शेतकऱ्यांना केली आहे. त्यामुळे एका भागातून दररोज चार ट्रक भरुन फळ, भाजी पाठविणारे शेतकरी आता एक ट्रक पाठवित आहे. घाऊक बाजारात दररोज सरासरी ४०० ट्रक भरुन येणारी फळांची आवक मागील १५ दिवसांत २५ टक्क्य़ांनी घटली आहे. बाजारात आलेल्या मालावर व्यापारी चार दिवस व्यापार करीत आहेत. उठाव नसल्याने त्यांचे भावही घसरले आहेत.
घाऊक बाजारात मोसंबी, संत्री, खरबूज, द्राक्षे, यांचे दर निम्मे खाली आले आहेत. यातील काही फळे शीतगृहात पाठवावी लागत आहेत. तर काही फळे तेथेही पाठविल्याने खराब होत असल्याने ती कमी दरात विकण्याशिवाय व्यापाऱ्यांना दुसरा पर्याय नाही.  
मुंबईतील फेरीवाल्यांची पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय ही कारवाई केली जात असल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचे फळ बाजार संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.
एपीएमसीच्या फळ, बाजारात सरासरी ४०० ट्रक भरून फळे येतात. मागील आठवडाभरात झालेली आवक अशा प्रमाणात होती.
२८ जानेवारी-   २५६
२९ जानेवारी-   १९३
३० जानेवारी-२०४
१ फेब्रुवारी-२०९
२ फेब्रुवारी-२३०
३ फेब्रुवारी-६२ (रविवार)
४ फेब्रुवारी-३१७

Story img Loader