मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकल, रेल्वेगाड्यामधून मोठ्या संख्येने विनातिकीट प्रवासी प्रवास करीत असून त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत होता. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत आहे. या तक्रारींची दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने विविध तपासणी अभियान राबवून एप्रिल ते जून या तीन महिन्यात ७.८४ लाख विनातिकीट प्रवाशांची धरपकड केली. त्यांच्याकडून ५२.१४ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.
हेही वाचा – मुंबई : एक कोटींच्या सोन्याची लगड घेऊन नोकर पसार
मुंबई उपनगरीय विभागात विनातिकीट प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेल्या १४.६३ कोटी रुपये दंडाचा त्यात समावेश आहे. पश्चिम रेल्वेवरील तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी आणि प्रवाशांना अधिकाधिक सुविधा पुरवण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रयत्नशील आहे. लोकल, मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि सुट्टीकालीन विशेष रेल्वेगाड्यांमधून तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे. पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते जून या कालावधीत तिकीट तपासणी करून ५२.१४ कोटी रुपये दंड वसूल केला. तर, जून २०२४ मध्ये आरक्षित न केलेले सामान घेऊन जाणाऱ्या २.२५ लाख विनातिकिट प्रवाशांवर कारवाई करून १४.१० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या १३ हजार प्रवाशांचीही धरपकड करण्यात आली असून त्यांच्याकडून ४३.६४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.