खाडी भागातून अवैधरित्या रेतीचा उपसा करणाऱ्या बोटींविरोधात ठाणे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी विशेष मोहिम हाती घेऊन कारवाई केली. त्यामध्ये तीन बोटी तसेच दहा संक्शन पंप, असा सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून तो मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. मुंब्रा-रेतीबंदर येथील खाडी भागात अवैधरित्या रेतीचा उपसा सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, ठाण्याचे उपविभागीय अधिकारी माधव पाटील तसेच प्रभारी तहसीलदार तुळशीराम मिरकुटे यांच्या पथकाने मंगळवारी या भागात कारवाई केली. दरम्यान, या कारवाईसाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईमध्ये पथकाने तीन बोटी आणि दहा संकशन पंप जप्त केले असून त्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे. हा ऐवज मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या बोटी कुणाच्या आहेत तसेच रेती उपसा करणारे वाळू माफिया कोण आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. 

Story img Loader