लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासाठी (एमएसआरडीसी) मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. या महामार्गावर आतापर्यंत सर्वाधिक अपघात महामार्ग संमोहनामुळे (रोड हिप्नोसिस) झाल्याचे उघडकीस आले आहे. ‘एमएसआरडीसी’ने महामार्ग संमोहनामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला असून आराखड्यातील उपाययोजनांच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. त्यानुसार समृद्धी महामार्गावरील रस्ते विविध रंगांनी रंगविण्यात येणार असून महामार्गाच्या दुतर्फा विशिष्ट अंतरावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच सचित्र फलक लावण्यात येणार असून वाहनांचा वेग वाढल्यास धोक्याची सूचना सायरन वाजणार आहे. या सर्व उपाययोजनांमुळे महामार्ग संमोहन रोखण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.

एमएसआरडीसीने मुंबई – नागपूरदरम्यान ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम हाती घेतले आहे. यापैकी नागपूर – शिर्डीदरम्यानचा ५२० किमी लांबीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. तर शिर्डी – भरवीरदरम्यानच्या ८० किमी लांबीच्या महामार्गाचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पहिला टप्पा सुरू झाल्याने नागपूर – शिर्डीदरम्यानचा प्रवास पाच तासांत पूर्ण होत आहे. मात्र या महामार्गावर मोठ्या संख्येने अपघातही होत आहेत. अपघात रोखण्याचे आव्हान एमएसआरडीसीसमोर उभे ठाकले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी एमएसआरसी तीन टप्प्यांवर काम करीत आहे. अपघात रोखणे, अपघात झालाच तर त्याची तीव्रता कमी करणे आणि अपघात झाल्यानंतर तात्काळ आवश्यक ती मदत मिळावी या तीन टप्प्यांवर काम केले जात आहे.

आणखी वाचा-मुंबईची तुंबई झाली तर अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांची तंबी

अपघात रोखण्यासाठी वाहनांच्या वेगमर्यादेवर लक्ष ठेवले जात आहे, वेगमर्यादा न पाळणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच पोलिसांची गस्तही सुरू आहे. अपघात झालाच तर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर शिर्डी – भरवीरदरम्यान क्रॅश कुशन बसविण्यात येत आहेत. अपघातानंतर तात्काळ मदत मिळावी यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. असे असले तरी अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. महामार्ग संमोहनामुळेच अधिक अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महामार्ग संमोहनातून वाहनचालकांना बाहेर काढण्यासाठी एमएसआरडीसीने विशेष कृती आराखडा तयार केल्याची माहिती एमएमआरडीएचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी दिली.

एमएसआरडीसीने सेव्ह लाईफ फाऊंडेशनच्या मदतीने एक अभ्यास केला आहे. या अभ्यासाच्या अनुषंगाने एक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यातील उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आल्याचे यादव यांनी सांगितले. समृद्धी महामार्ग अगदी सरळ, लांब रस्ता आहे. त्यामुळे प्रवास करताना दूरदूरपर्यंत डोळ्यांना पर्यायाने जागृतमनाला एकसूरीपणा दिसत राहतो. शिवाय रस्त्यावरील पांढरे पट्टे या एकसूरी पणात भर टाकतात. त्यामुळे क्षीण किंवा निष्क्रिय होऊन चालकाला संमोहनावस्था येते आणि गाडीवरचे नियंत्रण सुटून अपघात होतात. त्यामुळे आता रस्ते विविध रंगांनी रंगविण्यात येणार आहेत. महामार्गावर सचित्र फलक लावण्यात येणार आहेत. महामार्गाच्या दुतर्फा विशिष्ट अंतरावर विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत. वाहनचालकांना तंद्री लागू नये, त्यांना झोप येऊ नये यासाठीही काही प्रयत्न केले जाणार आहेत. वेग वाढला तर पोलिसांचा सायरन वाजेल, असेही यादव यांनी सांगितले. मुंबई – नागपूरदरम्यानच्या संपूर्ण टप्प्यात या उपाययोजना करण्यात येणार आहेत. या उपाययोजनांमुळे महामार्ग संमोहनाद्वारे होणारे अपघात रोखले जातील, असा दावा करण्यात येत आहे.

Story img Loader