मुंबई : पीओपी पर्यावरणाला घातक आहे, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. तसेच, याबाबत शासनाने कधीही संशोधन केले नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही पीओपी खरंच घातक आहे का, याबाबत अभ्यास केलेला नाही. त्यामुळे पीओपी घातक असल्याचे सिद्ध होईपर्यंत मूर्तिकार, कारखान्यांवर कारवाई करू नये, अशी भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी घेतली. तसेच, पीओपी बंदी हटवण्यासाठी येत्या २० मार्च रोजी न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परळमधील नरे उद्यान येथे मंगळवारी अखिल महाराष्ट्र मूर्तिकार महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने लागू केलेली पीओपी बंदी हटविण्याबाबत राज्यभरातील हजारो मूर्तिकारांनी संमेलनात उपस्थिती लावून शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. त्यावेळी पीओपी मूर्तींना पाठिंबा देताना शेलार बोलत होते. न्यायालयाने सार्वजनिक गणेश मूर्तींवर बंदी घातली आहे. घरगुती पीओपी गणेश मूर्तींवर बंदी नसताना मूर्तिकार आणि कारखान्यांवर कारवाई का केली जात आहे, असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला. वर्षानुवर्षे मोठ्या उत्साहात पीओपी गणेश मूर्तींसह गणेशोत्सव साजरा केला जात आहे, आणि भविष्यातही करत राहणार, असे ठाम प्रतिपादन करत अनेक वर्षांची ही परंपरा कधीही झुकू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.सणांसाठी परवानगी, कारखान्यांच्या जागेसाठी परवानगी, न्यायालयात याचिका, शाडूच्या मातीची सक्ती या सर्व हिंदू सणांविरोधातील कट आहे. पीओपी पर्यावरणपूरक आहे. मात्र, कोणत्याही यंत्रणेने याबाबत अभ्यास केला नाही. कोणताही वैज्ञानिक पुरावा नसताना पीओपी गणेश मूर्तींवर बंदी घालण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानेही पीओपी विषारी असल्याचा दावा केलेला नाही. तसेच, गुजरात सरकारने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची मदत घेऊन उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळवली. मात्र, महाराष्ट्रातील लोकांमध्ये याबाबत उदासीनता दिसून येते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत पीओपीसंदर्भात सर्वंकष अभ्यास अहवाल तयार करण्यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वात तज्ज्ञ समिती तयार करण्यात येणार आहे. मूर्तिकारांवर कुठलाही अन्याय होऊ नये, अशी महायुती सरकारची भूमिका आहे. न्यायालयात पीओपी बंदीविरोधात आवाज उचलणार आहे. याला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दुजोरा दिला.

बंदी कायम ठेवल्यास मूर्तिकारांवर आर्थिक संकट

अखिल महाराष्ट्र मूर्तिकार महासंमेलनात राज्यभरातून आलेल्या हजारो मूर्तिकार, शिल्पकार गणेशभक्तांच्या घोषणाबाजीने परळ परिसर दणाणून सोडला. पीओपी पर्यावरणपूरक असून त्यावरील बंदी मागे घ्यावी, अशी भूमिका हजारो मूर्तिकारांनी घेतली. पीओपीच्या हट्टापायी अनेक वर्षांपासून मूर्तिकारांची पिळवणूक होत असल्याचा सूर या संमेलनात उमटला. पीओपीसंदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र बंदचा इशारा सरकारला देण्यात आला. तसेच, लाखो रुपयांचे कर्ज काढून मूर्तिकारांनी व्यवसायात गुंतवले आहेत, बंदी कायम राहिल्यास त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवेल, अशी भावना मूर्तिकारांनी संमेलनात व्यक्त केली.