मुंबई : शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य उत्पादनांच्या विक्रीस बंदी आहे. असे असतानाही सर्रास विक्री होत असल्याने पानटपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ‘परिमंडळ ७’ने विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत पोलिसांनी एकूण ५०९ जणांविरोधात कारवाई केली.
पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि घाटकोपर परिसरात अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत. या शाळा आणि महाविद्यालयांलगतच्या १०० शंभर मीटर परिसरात अनेक पान टपऱ्या असून यामध्ये मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री होते. परिणामी, विद्यार्थी व्यसनांच्या आहारी जात असून याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि अभ्यासावर होत होता. हीच बाब लक्षात घेऊन ‘परिमंडळ ७’चे पोलीस उपायुक्त विजय सागर यांनी परिसरातील शाळा आणि महाविद्यालय तंबाखू मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष पथकाची स्थापना
शाळा, महाविद्यालयांलगतच्या १०० मीटर परिसरातील तंबाखुजन्य उत्पादनांच्या विक्रीवर निर्बंध घालता यावे यादृष्टीने प्रत्येक पोलीस ठाण्यात एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने शाळा परिसरात असलेल्या ३०० हून अधिक पान टपरी चालकांची तपासणी करून त्यांना समज दिली. यावेळी काही दुकानांमध्ये तंबाखूजन्य उत्पादने आढळली. संबंधित दुकानदारांना दुकानात तंबाखूजन्य उत्पादने विक्रीस ठेऊ नये अशी विनंती करण्यात आली. मात्र विनंती केल्यानंतरही तंबाखुजन्य उत्पादनांची विक्री करणाऱ्या ५०९ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली. तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री करणाऱ्या ४५ जणांनी त्यांचे व्यवसाय बंद केले, तर २४ दुकानदारांनी इतर व्यवसाय सुरू केला.
शाळेच्या आवारात जनजागृती फलक
‘परिमंडळ ७’अंर्तगत येणाऱ्या मुलुंड, नवघर, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, पार्कसाईट, घाटकोपर आणि पंतनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी २०२५ पासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक शाळेच्या आवारात जनजागृती फलक देखील लावण्यात आले. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसत असून संपूर्ण मुंबईत आशा प्रकारची मोहीम राबण्याची मागणी सध्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तंबाखूजन्य उत्पादनांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. आगामी काळात ही मोहीम अशीच सुरू ठेवण्यात येणार असून सर्वसामान्य नागरिकांचा या मोहिमेला पाठींबा मिळत आहे. -विजय सागर, पोलीस उपायुक्त परिमंडळ ७