मध्य प्रदेश, पंजाब, केरळ, गोवा, गुजरातच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही करोनावर उपचारासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी या चिकित्सापद्धतींचाही वापर करण्यात येणार असून त्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल स्थापन करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने लक्षणे न दिसणाऱ्या करोना रुग्णांवर आणि अल्पप्रमाणात लक्षणे दिसणाऱ्या करोनारुग्णांवर उपचारासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी या चिकित्सापद्धतींचाही वापर करण्याची सूचना राज्यांना के ली होती. त्यानुसार महाराष्ट्रातही करोनावर उपचारासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी आदी चिकित्सापद्धतींचा वापर करण्यासाठी राज्य सरकारने कृती दल स्थापन केले आहे. या कृती दलाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

या कृती दलात महाराष्ट्रातील आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. कुलदीप राज कोहली, डॉ. शुभा राऊळ, आयुर्वेद चिकित्सिक डॉ. हरीश सिंग, डॉ. उदय कुलकर्णी, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. जवाहर शहा, डॉ. जसवंत पाटील, युनानी चिकित्सिक डॉ. झुबेर शेख आदींचा समावेश आहे.