‘स्वच्छ भारत अभियाना’त सहकार्य न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी सहकार्य न करणाऱ्या हॉटेल आणि दुकान मालकांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा केल्यानंतर मुंबई महापालिकेनेही स्वच्छतेचा वसा घेतला आहे. सर्व विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये व्यापक प्रमाणावर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी दुकानदार आणि हॉटेल मालक सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. महापालिका प्रशासनाने या तक्रारींची दखल घेऊन हॉटेल मालक व दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘स्वच्छता अभियाना’त सहकार्य न करणारे दुकानदार आणि हॉटेल मालकांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशांना तात्काळ नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सुमारे दोन ते पाच हजार रुपयांचा दंड त्यांच्यावर ठोठावण्यात येणार आहे. त्यानंतरही दाद न देणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या मुंबईमध्ये ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात येत असून पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमधील दुकाने व आस्थापना विभागातील १०९ निरीक्षक दुकानदार आणि हॉटेल मालकांवर नजर ठेवून आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अटक झालेली व्यक्तीच बेपत्ता !
प्रतिनिधी, मुंबई : ट्रॉम्बे पोलिसांच्या अजब कारभाराचा एक संतापजनक नमुना समोर आला आहे. मद्यपान केल्याप्रकरणी एका इसमाला पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले. तर नंतर त्याच्या नातेवाईंकांनी केलेली तो बेपत्ता असल्याची तक्रारही याच पोलीस ठाण्याने दाखल करून घेतली.
युनुस खान (३६) हा ट्रॉम्बेच्या चिता कॅम्प परिसरात राहतो.  मागील आठवडय़ात त्याला ट्रॉम्बे पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत अटक केली. न्यायालयाने त्याला ८ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. ट्रॉम्बे पोलिसांनी त्याचा मोबाईल, पैशांचे पाकीट आदी वस्तू जप्त केल्या होत्या. दरम्यान, युनुस खान घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी ट्रॉम्बे पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी पोलिसांनी युनूस खान बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करून घेतली. ज्या इसमाची आपण बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतोय, त्याला आपणच अटक केली आहे, याचेही भान पोलिसांना नव्हते. ८ दिवसांनी तुरुंगातून सुटल्यानंतर युनूस खानने पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या वस्तू घेतल्या आणि घरी परतला. तो घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. युनूस खानने चुकीचा पत्ता सांगितला होता, त्यामुळे हा गोंधळ झाल्याची सारवासारव ट्रॉम्बे पोलिसांनी केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक बेपत्ता
मुंबई : कफ परेड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय चव्हाण हे  बेपत्ता आहेत.    रविवारी त्यांची रात्रपाळी होती.  परंतु ते कामावर पोहोचले नाहीत.  त्यांचा कुठलाही संपर्क न झाल्याने चव्हाण यांच्या पत्नीने नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

मुंबईत तीन नवीन पोलीस परिमंडळे होणार
प्रतिनिधी, मुंबई : मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पोलीस दलाची नव्याने निजोजनबद्ध रचना करण्यात येणार आहे. यासाठी तीन नवीन विभागीय पोलीस परिमडंळे स्थापन केली जाणार आहेत. यासंदर्भातला प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात मंजुरीसाठी असून त्यासाठी समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे.
 मुंबई शहरात सध्या एकूण ९२ पोलीस ठाणी असून १२ विभागीय पोलीस परिमंडळे आहेत. पोलीस उपायुक्त या परिमंडळाचे प्रमुख असतात. सध्या काही परिमंडळाच्या अखत्यारित ६ तर काही परिमडंळांच्या अखत्यारित १० पोलीस ठाणी येतात. या परिमंडळातील पोलीस ठाण्याची संख्या समान असावी, भौगौलिकदृष्टय़ा एकसंघता असावी यासाठी माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्या कालावधीत एक प्रस्ताव तयार करण्यात आला होता. सर्व प्रादेशिक विभाग, परिमंडळातील विभाग आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या विभागाची पुनर्रचना व्हावी, असे या प्रस्तावाचे स्वरूप आहे. त्यानुसार परिमंडळ १३, १४ आणि १५ अशी तीन नवीन परिमंडळे तयार करण्याचे प्रस्तावित आहे. सध्याचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनीही या प्रस्तावाला अंतिम रूप देण्यासाठी निवृत्त पोलीस अधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती बनवली होती. या समितीने नुकताच आपला अहवाल सहपोलीस आयुक्त प्रशासन यांच्याकडे सादर केला आहे. त्यानंतर मुंबईत तीन नवीन परिमडंळे म्हणजेच तीन नवीन पोलीस उपायुक्त दाखल होतील.
अशी आहेत प्रस्तावित परिमंडळे
परिमंडळ १३-(गोरेगाव, बांगूर नगर, मालाड, मालवणी, ओशिवरा, अंबोली), परिमंडळ १४-(कांदिवली, चारकोप, एमएमचबी कॉलनी, गोराई, बोरिवली, दहिसर), आणि परिमंडळ १५ (दिंडोशी, आरे, वनराई, कुरार, समता नगर, कस्तुरबा मार्ग). असा प्रस्ताव तयार असून त्यावर काम सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

प्रवेशपत्र गोंधळावरून अधिसभा सदस्य आक्रमक
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू झाली तरी प्रवेशपत्र हातात न मिळाल्यामुळे विद्यापीठाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याप्रकरणी अधिसभा सदस्य आता आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी महाविद्यालये आणि विद्यापीठातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी माणगी अधिसभा सदस्यांनी केली आहे. विद्यापीठातील अल्केश दिनेश मोदी व्यवस्थापन संस्थेच्या तब्बल १२० विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवसापर्यंत प्रवेशपत्र मिळाले नव्हते ही बाब प्रथम समोर आली. यानंतर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध २० महाविद्यालयांमधील १०० हून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवसापर्यंत प्रवेशपत्र मिळाले नसल्याचे समोर आले. याप्रकरणी अधिसभा सदस्यांनी वेळीच दखल घेऊन परीक्षा नियत्रकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी मिळवून दिली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारे निवदेन परीक्षा नियंत्रकांना देण्यात येणार असल्याचे अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी सांगितले.

‘एकाही शिक्षकाला सेवामुक्त करणार नाही’
मुंबई :  अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर नवीन शिक्षणमंत्री विनोद तावडे तोडगा काढणार असल्याचे चित्र आहे. या संदर्भात शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी तावडेंची भेट घेतली असता अतिरिक्त ठरला म्हणून राज्यातील एकही शिक्षक सेवामुक्त केला जाणार नाही, असे आश्वासन तावडे यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले.शिक्षण हक्क कायद्यानुसार आणि नव्या शिक्षक संचमान्यतेच्या निकषांनुसार हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यावरून गेले दोन वष्रे विविध शिक्षक संघटना आणि शिक्षक आमदार आवाज उठवित आहेत.

विद्यापीठाचे बीएस्सीचे वेळापत्रक बिघडले
मुंबई : विद्यापीठात प्रवेशपत्राचा घोळ सुरू असतानाच मंगळवारी वेळापत्रकाचा घोळ समोर आला आहे. पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या बीएस्सीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात १८ नोव्हेंबर रोजी पाचव्या आणि सहाव्या सत्राची परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी आली आहे. यामुळे पाचव्या सत्रात एटीकेटी असलेल्या आणि सध्या सहाव्या सत्रात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्या सत्राची परीक्षा द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ५.३० या वेळेत पाचव्या सत्राचा ऑरगॅनिक केमिस्ट्री आणि सहाव्या सत्राचा अप्लाइड कंपोनंट हे दोन पेपर घेण्यात येणार आहेत. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एटीकेटी आहे अशा विद्यार्थ्यांना आपण नेमकी कोणती परीक्षा द्यावी, असा प्रश्न पडला आहे. या संदर्भात अधिसभा सदस्य संजय वैराळ यांनी परीक्षा विभागाला लक्ष्य करत त्यांच्या गलथान कारभाराबाबात ताशेरे ओढले आहेत. दरम्यान या प्रकरणी आमच्याकडे एक तक्रार ई-मेलद्वारे प्राप्त झाली असून यात नेमके काय झाले आहे याची माहिती घेऊन वेळापत्रकात आवश्यक ते बदल केले जातील असे परीक्षा विभागातर्फे सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action will be taken against who not supported swachh bharat abhiyan