नॅकचे नामांकन मिळवा अन्यथा नवीन अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही, या ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’च्या (यूजीसी) सूचनेला मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी फारसे मनावर घेतलेले दिसत नाही. कारण, विद्यापीठाच्या तब्बल ६७९ महाविद्यालयांपैकी २४१ महाविद्यालयांनी अद्याप नॅकचे (नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिटीटेशन कौन्सिल) मानांकन मिळविलेले नाही. म्हणून नॅकचे मानांकन मिळवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा फतवा विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना जारी केला आहे.
विद्यापीठाने आपल्या सर्व महाविद्यालयांसाठी हे आदेश जारी केले असले तरी किती महाविद्यालये ही सूचना कितपत गांभीर्याने घेतील अशी शंका आहे. कारण, वीर जिजामाता तंत्रशिक्षण संस्था (व्हीजेटीआय), सरकारी विधी महाविद्यालय (जीएलसी) आदी नामवंत सरकारी शिक्षण संस्थांव्यतिरिक्त केसी लॉ कॉलेज, रिझवी (बीएड, आर्किटेक्चर), पेणचे पंतगराव कदम महविद्यालय, एसआयईएस, नेरुळचे रामराव आदिक इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, के. जे. सोमैय्या आदी अनेक अनुदानित-विनाअनुदानित महाविद्यालयांकडे नॅकचे मानांकन नाही.
नॅक ही यूजीसीची मान्यताप्राप्त संस्था असून देशभरातील शिक्षण संस्थांची पाहणी करून त्यांचा शैक्षणिक दर्जा ठरविते. सर्व शिक्षण संस्थांनी नॅकद्वारे पाहणी करवून घेऊन मानांकन मिळवावे, असे यूजीसीचे आदेश आहेत. पण, अनेक संस्था यूजीसीच्या आदेशाकडे कानाडोळा करून मानांकनाच्या प्रक्रियेत सहभागी होत नाहीत. त्यामुळे, मुंबई विद्यापीठाशी संलग्नित तब्बल २४१ संस्थांकडे अद्याप नॅकचे मानांकन तरी नाही किंवा त्यांनी आधी मिळालेल्या मानांकनाची मुदत संपल्यानंतर ते पुनर्मानांकित करून तरी घेतलेले नाही. यापैकी अनेक महाविद्यालयांनी तर त्यांचे अभ्यासक्रम सुरू होऊन सहा वर्षे झाली तरी नॅककडून मानांकन मिळविलेले नाही. नॅकचे मानांकन न मिळविण्यात अभियांत्रिकी आणि बीएड महाविद्यालये जास्त आहेत. अभियांत्रिकीच्या तब्बल ३३ महाविद्यालयांकडे नॅकचे मानांकन नाही, तर बीएडच्या २४ महाविद्यालयांनी अद्याप नॅककडून मानांकन मिळविण्याची तसदी घेतलेली नाही. यूजीसीने जानेवारी, २०१३मध्ये काढलेल्या एका आदेशातच नॅक बंधनकारक असल्याचे नमूद केले होते. त्या शिवाय नवीन अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अनेक संस्थांनी ही सूचना गांभीर्याने घेतलेली नाही. कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, व्यवस्थापन, अभियांत्रिकी आदी पारंपरिक अभ्यासक्रमांनाच नव्हे तर नव्याने सुरू झालेल्या बीएमएम, बीएमएस, बीएफएम, बीएस्सी-आयटी आदी अभ्यासक्रमांसाठीही नॅक मानांकन मिळविणे संस्थांना बंधनकारक आहे.

Story img Loader