राज्यातील सिंचनाच्या एका कंत्राटात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना २७.५ कोटी रुपये मिळाल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला आहे. या प्रकल्पाचे कंत्राट देण्यासाठी एकूण ४३.८३ कोटी रुपयांची लाच वाटण्यात आली. त्यापैकी सर्वांत मोठा हिस्सा अजित पवार यांना मिळाल्याचे पाटकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी पाटकर यांचे सर्व आरोप निराधार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलीये. 
भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनादेखील या कंत्राटासाठी लाच देण्यात आल्याचा आरोप पाटकर यांनी केलाय. त्यांच्यासह राज्यातील अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱयांनाही लाच देण्यात आली होती, असा आरोप त्यांनी केलाय. मुंडे यांनीदेखील स्वतःवर करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे म्हंटले आहे.
महालक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक धीरेंद्र अनंत भट यांच्या निवासस्थानातून प्राप्तिकर विभागाने जप्त केलेली कागदपत्रे, डायरी यावर कंत्राट मिळवण्यासाठी कोणा-कोणाला आणि किती रकमेचे वाटप करण्यात आले, याची सविस्तर माहिती देण्यात आली असल्याचे पाटकर यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी पाटकर यांनी केली आहे.