मुंबई : ‘ब्रिटिशांनी ‘केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट पाहिल्यावर त्यांना १०६ वर्षांपूर्वी घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या भीषणतेची जाणीव होईल आणि त्यांच्या तोंडून नकळतच माफीसह सगळ्या गोष्टी बाहेर येतील’ असा विश्वास व्यक्त करत ब्रिटिश सरकार आणि किंग चार्ल्स यांनी हा चित्रपट पाहावा, अशी आपली इच्छा असल्याचे अभिनेता अक्षय कुमारने सांगितले. १०६ वर्षांपूर्वी घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची कथा सांगणाऱ्या ‘केसरी चॅप्टर २’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत अक्षयने ही भूमिका मांडली.

मार्चमध्ये ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी ब्रिटिश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणी भारतीय जनतेची औपचारिक माफी मागावी, अशी मागणी तेथील संसदेत केली होती. त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, ब्रिटिशांनी माफी मागावी, अशी मागणी मी करणार नाही. पण किमान त्यांनी हा चित्रपट पाहावा आणि त्यांना त्यांच्याकडून घडलेल्या चुकीची जाणीव व्हावी, अशी भावना अक्षयने व्यक्त केली.

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केसरी’ चित्रपटात २१ शीख सैनिकांच्या धैर्याची आणि बलिदानाची कहाणी दाखविण्यात आली होती. आता ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटात जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित विविध गोष्टी मांडण्यात आल्या असून हा चित्रपट १८ एप्रिलपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या पत्रकार परिषदेत अक्षय कुमारसह अभिनेत्री अनन्या पांडे, निर्माता करण जोहर, दिग्दर्शक करण सिंग त्यागी, धर्मा प्रॉडक्शनचे अपूर्व मेहता यांच्यासह कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.

‘माझे वडील अमृतसरचे आहेत. माझ्या आजोबांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा थरार जवळून पाहिलेला आहे. त्यामुळे या हत्याकांडासंबंधी विविध गोष्टी आजोबांनी वडिलांना सांगितल्या होत्या. वडिलांकडून त्या मी ऐकल्याने मला लहानपणापासूनच या घटनेच्या भीषणतेची जाणीव होती. त्यामुळे ‘केसरी चॅप्टर २’ या चित्रपटात भूमिका साकारणे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण होते. दिग्दर्शक करण सिंग त्यागी यांनी या चित्रपटाचे कथानक ऐकवले, तेव्हा मी क्षणार्धात भूमिकेसाठी होकार दिला’, असेही अक्षय कुमारने सांगितले.

‘केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या ‘केसरी’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘केसरी’मध्ये अक्षय कुमार याने हवालदार ईश्वर सिंहची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटामध्ये अक्षय कुमारने जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा देणाऱ्या सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारली आहे. तर आर. माधवन ब्रिटिश साम्राज्याच्या वकिलाची भूमिका साकारत असून अनन्या पांडे ही दिलरीत गिलच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंग त्यागी यांनी केले आहे.