मुंबई : अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता अरमान कोहली याला उच्च न्यायालयाने मंगळवारी अखेर जामीन मंजूर केला. गेले वर्षभर तो कारागृहात आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी मंगळवारी अरमान याची जामिनाची मागणी मंजूर करून एक लाख रुपयांच्या बंधपत्रावर त्याची सुटका करण्याचे आदेश दिले. याशिवाय भविष्यात तो सारखाच गुन्हा करताना आढळल्यास त्याचा जामीन रद्द करण्याची मागणी तपास यंत्रणा करू शकते, असेही न्यायालयाने अरमान याला जामीन मंजूर करताना स्पष्ट केले. न्यायालयाने त्याला महिन्यातून एकदा एनसीबीच्या कार्यालयात उपस्थिती लावण्याचे आदेशही दिले आहेत.
अरमान याच्याकडे १.२ ग्रॅम कोकेन सापडले होते. अमलीपदार्थ विक्रीचा आरोप असलेल्या आरोपीच्या चौकशीदरम्यान अरमानचे नाव समोर आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अरमानच्या निवासस्थानी छापा टाकून त्याला अटक केली. विशेष न्यायालयाने यापूर्वी अरमानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका केली होती. मात्र, न्यायालयाने गेल्या डिसेंबरमध्ये त्याची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर अरमानने नव्याने विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. तसेच एनसीबीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर हा जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र विशेष न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा जामिनाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.