समाजाला आपण काही देणे लागतो, या भावनेतून दिलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान. या वर्षीच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’रूपी याच सर्वश्रेष्ठ दानयज्ञाची बुधवारी हृद्य सोहळ्याने पूर्णाहुती झाली. सामाजिकतेचे भान जपून, वंचितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या निवडक १० संस्थांना राज्यभरातील वाचकांकडून प्राप्त झालेले धनादेश यावेळी संबंधित संस्थांना सुपूर्द करण्यात आले. समाजाने समाजाला दिलेल्या दानाचा हा अर्पण सोहळा साजरा झाला तो अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या साक्षीने. आपल्या समिधांमधून साकारलेल्या या दानयज्ञाचा पूर्णाहुती सोहळा काही देणगीदारांनीही ‘याचि देही याचि डोळा’ पाहिला.
विविध क्षेत्रांमधील उणिवा हेरून त्या दूर करण्यासाठी शेकडो संस्था राज्याच्या कानाकोपऱ्यात निरपेक्षपणे काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ते कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘लोकसत्ता’ गेली चार वर्षे ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून करत आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या दहाही दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी एका संस्थेच्या कार्याचा आढावा ‘लोकसत्ता’ने घेतला होता. तसेच या संस्थांना आर्थिक मदत करण्याचे आवाहनही सर्व वाचकांना केले होते. वाचकांनीही या दानयज्ञात यथाशक्ती समिधा अर्पण केल्या आणि थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल सव्वादोन कोटी रुपयांची रक्कम धनादेशांच्या स्वरूपात जमा झाली.
हे धनादेश सर्व संस्थांकडे सुपूर्द करण्याचा हृद्य सोहळा खास निमंत्रितांच्या उपस्थितीत एक्स्प्रेस टॉवरमधील ‘गॅलरी’मध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान (नांदेड), केकी मूस प्रतिष्ठान (चाळीसगाव), आधाराश्रम (नाशिक), ज्ञानदा वसतिगृह (वरोरा), कॅन्सर पेशंट एड असोसिएशन (मुंबई), विज्ञान आश्रम (पाबळ), जीवनज्योत मंडळ (पुणे), ग्राममंगल (डहाणू), स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय (मंडणगड) आणि अहिंसा (मुंबई) या दहाही संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते या प्रतिनिधींकडे जमलेले धनादेश सुपूर्द करण्यात आले.
आतापर्यंत महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात सुरू असलेल्या आमच्या संस्थांचे कार्य ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रभरातच नाही, तर ‘लोकसत्ता’चे वाचक असलेल्या सर्वच देशांमध्ये पोहोचले आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात संस्थेची माहिती प्रसिद्ध झाल्या दिवसापासून दूरध्वनी आणि मदतीचा ओघ सुरू आहे. ही मदत आमच्यासाठी अनमोल आहे. समाजहिताचे अनेक संकल्प या मदतीमुळे तडीस जाणार आहेत, असे हृद्गत सर्वच संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.
(सामाजिक संस्थांनाही व्यावहारिक दृष्टिकोन हवा – अतुल कुलकर्णी.. रविवारच्या अंकात)
भान आणणारा उपक्रम
आपण किती छोटे आहोत, नगण्य आहोत, किंवा आपण काहीच करत नाही, असे वाटायला लावणारे काही प्रसंग घडत असतात. आजचा हा सोहळा तसाच आहे. या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींचे आभार मानायला हवेत. यांचे कार्य ऐकून भवतालाचे भान येते. हे भान येणे, हीच एका प्रक्रियेची सुरुवात असते. हे भान आणण्यात ‘लोकसत्ता’चा मोलाचा वाटा आहे. विशेष म्हणजे ‘दान’ या शब्दाचा संबंध धर्म किंवा देव यांच्याशी येत असतानाही महाराष्ट्रातील एवढय़ा लोकांनी अशा मोठय़ा कार्याना हातभार लावला, ही माझ्यासाठी दिलासादायक बाब आहे.
– अतुल कुलकर्णी, अभिनेता