मुंबई : नाटकाचे वेड मनात घेऊन अत्यंत उत्साहाने रंगमंचावर आपली एकांकिका सादर करणाऱ्या युवा रंगकर्मींची ऊर्जा आणि कधीकाळी शून्यातून सुरुवात करत अभिनय क्षेत्रात आख्यायिका ठरलेल्या प्रतिभावंत कलाकारांचे विचारतेज हा संगम ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचाने अगदी पहिल्या पर्वापासून अनुभवला आहे. हीच परंपरा यंदाही कायम राखत एका बहुगुणी कलावंताची उपस्थिती ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्याला लाभणार आहे. ‘सॅक्रेड गेम्स’मधील ‘गुरुजी’; ‘वासेपूर’मधील सुलतान; ‘ओह माय गॉड २’मधील कांतिशरण मुद्गल अश प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारे प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा >>> गीतांजली कुलकर्णी, हृषीकेश जोशी यांच्याबरोबर आज ‘रंगसंवाद’
‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा म्हणून गेल्या आठ वर्षांत नाट्यवर्तुळात आणि युवा रंगकर्मींमध्येही प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून नावाजली गेली आहे. या स्पर्धेत आपले कसब दाखवणाऱ्या युवा कलावंतांना केवळ नाट्यक्षेत्रातच नव्हे तर दूरचित्रवाहिनी, चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये काम करण्याची संधी मिळते. मोठ्या तयारीने आणि जिद्दीने स्पर्धेत उतरणाऱ्या या तरुण रंगकर्मींना दरवर्षी अत्यंत प्रतिभावान, यशस्वी कलावंतांकडून त्यांचे अनुभवी विचार ऐकण्याची संधी मिळते. यंदा या तरुण रंगकर्मींमध्येही लोकप्रिय असलेले अभिनेते पंकज त्रिपाठी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर उपस्थित राहणार आहेत.
© The Indian Express (P) Ltd