ज्येष्ठ नाटय़-चित्रपट अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे आज निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अमरापूरकर यांनी रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. अमरापूरकर यांच्या फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाल्याने त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील भाईदास हॉलमध्ये सकाळी ११ वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून मंगळवारी अहमदनगरमध्ये दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोटो गॅलरी : सुजाण नागरिक, अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता

मराठी नाटकांमधून आव्हानात्मक भूमिका केल्यानंतर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांत देखिल लक्षवेधी भूमिका साकारल्या. ‘हॅण्ड्स अप’ या नाटकातून त्यांनी रंगमंचावर अभिनय आणि ‘अर्धसत्य’मधील त्यांची खलनायकाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘सडक’ या हिंदी चित्रपटातील त्यांची तृतीयपंथीयाची भूमिका विशेष गाजली. त्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

जवळपास तीन दशकांहून अधिक काळ विविध चित्रपटांतून नायक, खलनायक, चरित्र अभिनेता, विनोदी भूमिका साकारून अमरापूरकर यांनी आपल्या दमदार अभिनायामुळे प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं. ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. मोहरा, आखें, इश्क, गुप्त चित्रपटांतील विनोदी भूमिकांमुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली.

सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही अमरापूरकर याची विशेष ओळख होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल’ मागणीच्या आंदोलनाला त्यांनी जाहिर पाठिंबा दर्शविला होता. तसेच डॉ. नरेद्र दाभोळकर यांची हत्या म्हणजे हे राज्य अराजकतेकडे चालले आहे, असेच समजावे लागेल. आता तरी सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करून त्यांना श्रद्धांजली वाहावी, अशी भूमिका अमरापूरकर यांनी मांडली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sadashiv amrapurkar passes away