मुंबई : गेल्या काही वर्षांत ऑनलाईन फसवणूकींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. सर्वसामान्य व्यक्तींसह विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तीही ऑनलाईन फसवणुकीला बळी पडले आहेत. समाजमाध्यमांवरील विविध लिंक्स, व्हिडिओ कॉल्स, बनावट फोन कॉल्स आदी विविध माध्यमातून नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर अभिनेता सागर कारंडे याची तब्बल ६१.८३ लाखांना ऑनलाईन फसवणूक झाल्याची चर्चा शुक्रवारी (४ एप्रिल) दिवसभर रंगली. मात्र, हा ‘सागर कारंडे’ मी नसून माझ्या नावाने पसरविण्यात येणारी गोष्ट संपूर्णतः खोटी आहे, असे अभिनेता सागर कारंडे याने नाशिक येथील एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

ऑनलाईन फसवणूकीला बळी पडल्याच्या सागर कारंडे नामक व्यक्तीच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात ( उत्तर विभाग ) ३ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणा संदर्भातील संपूर्ण घटनाक्रम या सागर कारंडेने सायबर पोलिसांना सांगितला आहे. फेब्रुवारी महिन्यात सागर कारंडे नामक व्यक्तीला अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअप मेसेज आला.

सदर महिलेने सागरला इन्स्टाग्राम लिंक पाठवली आणि प्रत्येक लाइकसाठी १५० रुपये मिळतील असे सांगितले. तसेच, घरबसल्या पैसे कमावण्यात येतील, असा दावाही केला. त्यानंतर सागरने हे काम करण्यास सहमती दर्शवली आणि संबंधित इन्स्टाग्राम पोस्ट लाइक करण्यास सुरुवात केली. त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याला सुरुवातीला काही पैसेही पाठविण्यात आले.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने सागरची फसवणूक करून ६१.८३ लाख रुपये उकळण्यात आले. त्यामुळे सागर कारंडेची झालेली फसवणूक हा शुक्रवारी चर्चेचा मुद्दा ठरला. मात्र, त्याचदिवशी पैशांसंदर्भात ऑनलाईन फसवणूक झालेला हा सागर कारंडे मी नसून अन्य कोणी असल्याचे अभिनेता सागर कारंडे याने स्पष्ट केले.

‘सागर कारंडे नावाचा मी एकच व्यक्ती नाही, खूप आहेत. तुम्ही गूगलवर सर्च केले तरी या नावाच्या खूप व्यक्ती दिसतील. माझ्या नावाने पसरविण्यात येणारी गोष्ट संपूर्णतः खोटी आहे. ६१ लाख रुपये माझ्याकडे कसे असतील? ही खूप मोठी रक्कम आहे. एवढी रक्कम माझ्याकडे असती, तर मी बाकीच्या गोष्टी केल्या असत्या. मी एका नाटकाची निर्मिती केली असती. मुंबईला गेल्यानंतर मी सर्वप्रथम पोलीस ठाण्यात जाणार आहे. या सगळ्याचा तपास करणार आहे आणि अब्रुनुकसानीचा दावाही करणार आहे’, असे अभिनेता सागर कारंडे याने स्पष्ट केले.