मुंबई: महादेव बुक बेटिंग ॲपप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेता साहिल खानसह चौघांना समन्स पाठवले आहे. याप्रकरणी साहिल खानने अटकपूर्व जामिनासाठी न्याायलयात धाव घेतली होती. पण त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता. हे प्रकरण नुकतेच गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी आरोपी अमित शर्माला समन्स बजावण्यात आले. पण तो हजर झाला नाही. आता गुन्हे शाखेने अभिनेता साहिल खान, त्याचा भाऊ सॅम आणि दुसरा आरोपी हितेश खुशलानी यांना शुक्रवारी चौकशीत सहभागी होण्यासाठी समन्स बजावले आहे.
याप्रकरणी तक्रारदार प्रकाश बनकर यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीनुसार आरोपी चंद्राकर आणि इतर हे मॅच फिक्सिंगमधून नफा कमावण्याच्या अप्रामाणिक हेतूने भारतात आयोजित केलेले प्रमुख क्रिकेट सामने व मालिकांचे निकाल निश्चित करण्यासाठी सक्रिय सहभागी आहेत. त्यात परदेशातील साथीदारांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच चंद्राकर मॅच फिक्सिंगसाठी लंडनमधील दिनेश खंबाट आणि चंदर अग्रवाल यांच्यामार्फत काम करतो, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांची नावेही तक्रारीत नमुद करण्यात आली आहेत. तसेच अमित शर्मा नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून बेटिंगची सर्व संकेतस्थळे चालवण्यात येतात. याप्रकरणी आता मुंबई पोलीस तपास करणार आहेत.
हेही वाचा… अनधिकृत सिमेंट मिक्सर प्रकल्प प्रदूषणाला कारणीभूत; गोवंडी आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशी त्रस्त
आरोपींनी जानेवारी २०१९ ते नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत एकूण १५ हजार कोटी रुपयांचा जुगार आणि सायबर फसवणूकी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ३१ जणांविरोधात भादंवि ४२०, ४६५, ४६७, ४६८, १२० (बी), १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (क), ६६ (फ) अंतर्गत माटुंगा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा करणार आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (फ) सायबर दहशतवादासाठी लावले जाते. महादेव बुक बेटिंगच्या प्रवर्तकांसह खिलाडी बेटिंग ॲप, पोर्टेल व संकेतस्थळांच्या नावाचाही तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.