मुंबई : घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अभिनेता सैफ अली खान याच्यावर लीलावती रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफवरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, त्याच्या जिवाला कोणताही धाेका नाही. आता त्याची प्रकृती सुधारत असून त्याला लीलावती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे ‘चीफ ऑपरेटिंग ऑफिसर’ डॉ. नीरज उत्तमनी यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सैफ अली खानच्या निवासस्थानी गुरुवारी पहाटे शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात सैफ जखमी झाला. त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर धारदार शस्त्राने सहा वार करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्याला दोन ठिकाणी खोलवर जखमा झाल्या असून, एक जखम मणक्याजवळ होती. त्याच्या मणक्यात चाकू घुसल्याने मोठी दुखापत झाली. चाकू काढण्यासाठी आणि मणक्यातील द्रव थांबविण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या डाव्या हाताला आणि मानेच्या उजव्या बाजूलाही आणखी दोन खोल जखमा होत्या.

हेही वाचा…कोल्ड प्लेच्या कार्यक्रमाच्या तिकिट विक्रीबाबत न्यायालय काय म्हणाले?

सुघटनशल्य चिकित्सक डॉ. लीना जैन यांच्या नेतृत्वाखाली सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास कुडवा यांनी शस्त्रक्रियेचे निरीक्षण केले. सैफची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून धोक्याबाहेर आहे. शुक्रवारी सकाळी त्याला अतिदक्षता विभागातून सामान्य कक्षामध्ये हलविण्यात येईल. त्यानंतर पुढील एक-दोन दिवसांनी त्याला घरी सोडण्यात येईल, अशी माहिती लीलावती रुग्णालयातील मज्जातंतुतज्ज्ञ डॉ. नितीन डांगे यांनी दिली.
खोलवर जखमा

सैफ अली खानवर मज्जातंतुतज्ज्ञ डॉ. नितीन डांगे, सुघटनशल्य चिकित्सक डॉ. लीना जैन, भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी, डॉ. नीरज उत्तमनी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती सुधारत आहे. जखमा खोलवर असल्या तरी लीलावती रुग्णालयातील डॉक्टर व त्यांच्या पथकाने योग्य व उत्तम उपचार केल्याची माहिती डॉ. नीरज उत्तमनी यांनी दिली. सैफ अली खानची प्रकृती सुधारत असून, त्याला लीलावती रुग्णालयाकडून सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याची हमी आम्ही देत आहोत. प्रशांत मेहता, विश्वस्त, लीलावती रुग्णालय

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor saif injured in knife attack has successfully operated and is out of danger mumbai print news sud 02