मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी कुख्यात अनमोल बिष्णोईविरोधात शुक्रवारी मुंबई पोलिसांनी लुक आऊट सर्कुलर जारी केले. अनमोल बिष्णोईने सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा कट रचला होता, तसेच गोळीबारानंतर त्याची जबाबदारी स्वीकारली होती.
लॉरेन्स बिष्णोई टोळी सध्या परदेशात असलेला अनमोल बिष्णोई चालवत आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार झाल्यानंतर अनमोल बिष्णोई नावाच्या फेसबुक खात्यावरून एक पोस्ट अपलोड करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात सहभागी अनमोलने हा गोळीबार सलमान खानसाठी पहिला आणि शेवटचा इशारा असल्याचे पोस्टमध्ये म्हटले होते. या पुढे भिंतींवर किंवा रिकाम्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत, असेही पोस्टमध्ये धमकावण्यात आले होते. सलमान खान, आम्ही तुला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केले आहे. त्यामुळे तुला आमच्या क्षमतेची जाणीव झाली असेल. तुझ्यासाठी हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे. या पुढे भिंतींवर किंवा रिकाम्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाही, अशी धमकी अनमोलने दिली होती. या पोस्टमध्ये दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्या नावाचाही वापर करण्यात आला होता. त्यात लॉरेन्स बिश्नोई गट आणि गुंड गोल्डी ब्रार, रोहित गोदारा आणि कला जठारी यांच्या नावांचा शेवटी उल्लेख होता. आयपी ॲड्रेसनुसार ही पोस्ट पोर्तुगाल येथून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. ही फेसबुक पोस्ट खरच पोर्तुगालवरून करण्यात आली की तंत्रज्ञानाच्या साह्याने तसे दाखवण्यात आले, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
अनमोल व त्याचा भाऊ लॉरेन्स बिष्णोई यांना सलमान खान गोळीबार प्रकरणात नुकतेच आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी अनमोल विरोधात लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले. अनमोल विरोधात पंजाब व चंदीगडमध्ये सुमारे १२ ते १३ गुन्हे दाखल आहेत. सलमान खान प्रकरणातही संपूर्ण कट अनमोलने रचला होता. गोळीबार करणाऱ्यांना पैसे व पिस्तुल पाठवून दिल्याचा आरोप अनमोलवर आहे.
पिस्तुल पुरवणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी
अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळील गोळीबाराप्रकरणी गुन्हे शाखेने पंजाब येथून अटक केलेल्या सोनू सुभाषचंदर बिष्णोई (३७) व अनुज थापन (३२) यांना शुक्रवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चंदर याची शेती व किराणा दुकान आहे. तसेच थापन हा ट्रकवर मदतनीस म्हणून कामाला आहे. बिष्णोई टोळीकडून दोन्ही आरोपींना दोन पिस्तुल व ४० काडतुसे पुरवण्यात आली होती. ती पिस्तुले देण्यासाठी चंदर व थापन १५ मार्च रोजी पनवेलला आले होते. ते पनवेलमध्ये तीन तास थांबले होते. त्यावेळी त्यांनी सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विक्की गुप्ता व सागर पाल यांना पिस्तुल दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोनू व अनुज यांना गुरूवारी पंजाबमधून अटक केली होती.