मुंबई : वांद्रे येथील घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने अभिनेता सलमान खानचा जबाब नोंदवला. गोळीबार झाला त्यावेळी अभिनेता सलमान खान घरीच होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणात साक्षीदार म्हणून सलमानचा जबाब नोंदवला. त्याच्या राहत्या घरी जबाब नोंदवण्यात आला आहे. सलमान चित्रीकरणासाठी परदेशात होता. त्यामुळे एवढे दिवस त्याचा जबाब नोंदवण्यात आला नव्हता. अखेर बुधवारी त्याच्या घरी जाऊन गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा जबाब नोंदवला. त्याला यापूर्वी आलेल्या धमक्यांची माहिती विचारण्यात आली. तसेच सुरक्षेबाबतही विचारपूस करण्यात आली. याप्रकरणातील मुख्य आरोपी परदेशात असून टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोईही सध्या कारागृहात आहे. लवकरतच गुन्हे शाखा त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे. याप्रकरणात सलमान खानचा जबाब महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

हेही वाचा – “जरांगे पाटलांनी थोडं सबुरीने घ्यावं, त्यांनी सरकारला…”; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची मागणी!

हेही वाचा – “भाजपा संघाचं ऐकत नाही, तरीही…”; संघाच्या मुखपत्रातील लेखावरून नाना पटोलेंची बोचरी टीका!

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने सागर पाल (२१), विकीकुमार गुप्ता (२४), सोनूकुमार बिश्नोई (३५) आणि अनुज थापन यांना बेड्या ठोकल्या होत्या. अनुज थापनने पोलीस कोठडीत आत्महत्या केली होती. सलमानच्या घरावर १४ एप्रिल रोजी गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना गुजरातमधून अटक केली होती. त्यांना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी सोनू सुभाषचंदर बिष्णोई (३७) व अनुज थापन (३२) यांना पंजाब येथून अटक करण्यात आली होती. चंदर याची शेती व किराणा दुकान आहे. तसेच थापन हा ट्रकवर मदतनीस म्हणून कामाला आहे. बिष्णोई टोळीकडून दोन्ही आरोपींना दोन पिस्तुल व ४० काडतुसे पुरवण्यात आली होती. ती पिस्तुले देण्यासाठी चंदर व थापन १५ मार्च रोजी पनवेलला आले होते. ते पनवेलमध्ये तीन तास थांबले होते. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विक्की गुप्ता व सागर पाल यांना त्यांनी पिस्तुल दिले होते. याप्रकरणातील आरोपी अनुज थापन याने नुकतीच पोलीस कोठडीत आत्महत्या केली होती. त्याशिवाय टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिष्णोई व त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी अनमोल बिष्णोई विरोधात लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor salman khan statement was recorded by the crime branch mumbai print news ssb
Show comments