मुंबई : मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून अभिनेता सलमान खानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी १६ वर्षांच्या मुलाला ठाण्यातील शहापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
एका व्यक्तीने सोमवारी रात्री मुंबई नियंत्रण कक्षाला फोन करून सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली. ‘मी ३० तारखेला सलमान खानला मारणार आहे, त्याला सांगा’, असे सांगून या व्यक्तीने दूरध्वनी बंद केला. आपले नाव रॉकी भाई, गौशाला रक्षक असून आपण राजस्थानमधील जोधपूर येथून बोलत असल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी तपास केला असता दूरध्वनी करणारी व्यक्ती ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील डोळखांब येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक शहापूरला गेले. पोलिसांना पाहताच तो दुचाकीवरून पळ काढत होता. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्यानेच धमकीचा दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले. अखेर पुढील तपासासाठी या मुलाला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यापूर्वी अनेक वेळा सलमान खानला बिष्णोई टोळीकडून धमकी आली होती. तसेच त्याच्या कार्यालयात धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते.
हेही वाचा – गोवंडीतील अनधिकृत बांधकामाविरोधात मनसे आक्रमक
गेल्यावर्षी जून महिन्यात सलमानला अज्ञात व्यक्तीने धमकीचे पत्र पाठवून सिद्धू मुसेवालाप्रमाणे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यापाठोपाठ गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने एका मुलाखतीत सलमान खानला पुन्हा एकदा धमकी दिली होती. प्रसिद्धीसाठी नव्हे तर, एका हेतूसाठी आम्ही त्याला मारणार आहोत. प्रसिद्धी किंवा पैशासाठी कोणाला मारायचे असते तर आम्ही शाहरूख किंवा बॉलिवूडच्या कोणत्याही बड्या व्यक्तीला मारले असते, असेही लॉरेन्स मुलाखतीत म्हणाला होता. त्यानंतर सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील कार्यालयात दुपारी पावणेदोनच्या सुमारास धमकीचा ई-मेल आला होता. ‘गोल्डी भाईला सलमानबरोबर बोलायचे आहे. तसेच, लॉरेन्स बिष्णोई याची मुलाखत बघितली असेलच, नसेल तर त्याला बघायला सांग. प्रकरण मिटवायचे आहे. समोरासमोर बसून बोलायचे आहे. आता सांगितले आहे, पुढच्या वेळी झटका देऊ’, अशा आशयाचा हिंदी भाषेतील मजकूर त्यामध्ये होता. त्यानुसार, रोहित गर्ग, गोल्डी भाई आणि लॉरेन्स बिष्णोई विरोधात त्यांनी तक्रार दिली होती. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी धाकडराम रामलाल सियागला (२१) याला राजस्थान येथून अटक करण्यात आली होती.