मुंबई : अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी आली आहे. वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा संदेश आला आहे. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस व गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्स अॅप क्रमांकावर रविवारी हा धमकीचा संदश आला होता. त्याबाबतची माहिती वरळी पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी याप्रकरणी संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणे, शांतता भंग केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३५१(२) व ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सलमान खानला घरात घुसून मारणार तसेच त्याची मोटरगाडी बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी संदेशात देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी स्वतः याप्रकरणी वरळी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
यापूर्वीही वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश
यापूर्वीही वाहतूक पोलिसांकडे सलमान खानला मारण्याची धमकी दिल्याचा संदेश आला होता. त्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मी लॉरेन्सचा भाऊ बोलत आहे, सलमानला जर जिवंत रहायचे असेल, तर त्याला आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल. पाच कोटी रुपये द्यावे लागतील. तसे न केल्यास सलमानला जिवंत सोडणार नाही. आमची टोळी आजही सक्रीय आहे, असेही संदेशात धमकवण्यात आले आहे. याप्रकरणी वरळी पोलीस तपास करत आहेत.
यापूर्वीही, सलमानला मारण्याची धमकी मिळाली आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअॅप क्रमांकावर धमकी देणारा संदेश आला होता व आरोपीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. दोन कोटी रुपये न दिल्यास सलमानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी तत्काळ वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. तेव्हा धमकी देणारी व्यक्ती वांद्रे पश्चिमेकडील जामा मशिदीजवळ असल्याचे कळताच तेथे जाऊन पोलिसांनी आजम मोहम्मद मुस्तफा याला पकडले होते.
पोलीस चौकशीत त्याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. आरोपीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदत क्रमांकावर धमकीचा संदेश पाठवला होता. संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी झारखंडमधील एका २४ वर्षीय भाजी विक्रेत्याला वरळी पोलिसांनी अटक केली होती. आरोपीने टीव्ही पाहून सलमानला धमकवण्याचा कट रचला होता व वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी आणखी एक संदेश पाठवून आरोपीने माफीही मागितली होती.