आपल्या विनोदी अभिनयाने मराठी रसिकजनांचे दिलखुलास मनोरंजन करणारे अस्सल विनोदी अभिनेते व रंगकर्मी सतीश तारे (५३) यांचे यकृताचा विकार आणि गँगरीन झाल्याने बुधवारी निधन झाले. मंगळवारपासून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी आहे. त्यांचे शंभरावे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार होते.
सतीश यांचे वडील जयंत तारे नाटय़कर्मी असल्यामुळे बालनाटय़ांपासूनच सतीश यांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. अलीकडे ‘फू बाई फू’ या गाजत असलेल्या रिअॅलिटी शोच्या चौथ्या पर्वाचे ते विजेते ठरले होते.‘विच्छा माझी पुरी करा’मधील त्यांच्या अभिनयानेही रसिकांची मने जिंकली. ‘ऑल लाइन क्लीअर’ या नाटकाद्वारे सतीश तारे यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. ‘श्यामची मम्मी’, ‘जादू तेरी नजर’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी रसिकप्रेक्षकांना आपल्या उत्स्फूर्त अभिनयाची मोहिनी घातली. झी मराठी वाहिनीवरील ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत त्यांनी रंगविलेली ‘माऊली’ ही व्यक्तिरेखा घराघरांत पोहोचली.
मुक्त मुसाफिर
पुण्यात वडिलांच्या नाटकांतून अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या सतीश तारे यांनी आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वामुळे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, नाटय़निर्मिती अशा नाटकाच्या सगळ्याच प्रांतात मुक्त मुशाफिरी केली. ‘ऑल लाइन क्लीअर’ या सस्पेन्स कॉमेडीद्वारे त्यांनी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर प्रथम पदार्पणातच आपली नाममुद्रा उमटविली. उत्स्फूर्त लवचिकता, हजरजबाबीपणा, विनोदाची अंगभूत उत्तम जाण आणि भान, जबरदस्त टायमिंग सेन्स या गुणांमुळे त्यांनी अल्पावधीतच नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या तिन्ही माध्यमांत आपले स्थान निर्माण केले. ‘श्यामची मम्मी’, ‘जादू तेरी नजर’, ‘आम्ही बिघडलो’, ‘असा मी असामी’, ‘शुभ बोले तो नारायण’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘सगळं कसं गुपचूप’, ‘चल घेऊन टाक’, ‘रात्रीच घोटाळा झाला’, ‘गोलगोजिरी’ इत्यादी त्यांची नाटके गाजली. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘वळू’, ‘बालक पालक’, ‘नवरा माझा भवरा’ आदी चित्रपटांतूनही त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. दूरचित्रवाणीवरील ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘फू बाई फू’, ‘घडलंय बिघडलंय’, ‘सारेगम’ आदी मालिका व रिअॅलिटी शोज्मधूनही त्यांनी आपली छाप पाडली.
गायनाचे त्यांचे अंग दुर्लक्षित राहिले तरी जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या गायनातील हुन्नरही प्रकट केला.
अभिनेते सतीश तारे यांचे निधन
आपल्या विनोदी अभिनयाने मराठी रसिकजनांचे दिलखुलास मनोरंजन करणारे अस्सल विनोदी अभिनेते व रंगकर्मी सतीश तारे (५३) यांचे यकृताचा विकार आणि गँगरीन झाल्याने बुधवारी निधन झाले. मंगळवारपासून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी आहे. त्यांचे शंभरावे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार होते.
आणखी वाचा
First published on: 04-07-2013 at 01:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor satish tare died in mumbai