मुंबई : ‘विविध स्तरांवर व्यक्ती घडत असतात. शिक्षण हा आयुष्य घडविण्याचा एक मार्ग आहे, परंतु पूर्वीचा काळ आणि आताचा काळ पाहिल्यास शिक्षण क्षेत्रासह समाजातील सर्वच क्षेत्रातील नैतिकता ढासळली आहे. नैतिकतेची घटलेली टक्केवारी वाढविण्याची गरज आहे. समाजात काही प्रमाणात नैतिकतेने जगणारी माणसे आहेत, त्यामुळेच समाज सुरळीतपणे सुरू आहे.
आपण अशा नैतिकतेने जगणाऱ्या माणसांसोबत उभे राहिले पाहिजे. त्यांच्या खाद्याला खांदा लावून काम केले पाहिजे’, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
शिक्षण, समाज आणि राजकारणाचा अनोखा मेळ असलेला ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ हा नवाकोरा मराठी चित्रपट ११ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. एका विनोदी कथेतून समाजाला अंतर्मुख करणारा विचार ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे.
फटमार फिल्म्सच्या सहयोगाने सिक्स पर्पल हार्टसची प्रस्तुती असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटाची निर्मिती नेहा गुप्ता आणि प्रसाद नामजोशी यांनी केली आहे. विजय नारायण गवंडे, श्रीकांत देसाई या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी या जोडीने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, सुयश झुंजुरके, छाया कदम, विजय निकम, शिवराज वाळवेकर अशी दमदार कलाकारांची फौज आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनमोकळा संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले.
सध्याच्या स्पर्धात्मक जगात अनपेक्षित घडामोडी घडत असून माणूसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे समाजातील नैतिकता ढासळली असून ती वाढविणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. दरम्यान, ‘गेल्या अनेक वर्षांपासून एकाच वेळेस अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. जे चित्रपट लोकांना आवडतात, त्या चित्रपटासाठी चित्रपटगृहात निश्चितच गर्दी होते. परंतु जेव्हा एका चांगल्या विषयावर चित्रपट येतो, तेव्हा आपल्या मराठी भाषेसाठी व महाराष्ट्रासाठी प्रेक्षकांनी सर्वप्रथम मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत, त्यानंतर इतर भाषिक चित्रपट पाहावेत, किमान इतके प्राधान्य मराठीला द्यायलाच हवे’, असेही सयाजी शिंदे यांनी सांगितले.