हिंदीतील प्रसिध्द दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या कंपूतील कलाकारांची टोळी पडद्यामागे आणि पडद्यावरही एकत्र धमाल करताना दिसते. यात हिंदी – मराठी कलाकार असा कुठलाही फरक राहात नाही. या कंपूतील मित्रांच्या जोडीपैकी एक जोडी आहे ती अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव याची… ‘सिम्बा’ या चित्रपटात हे दोघे एकत्र आले होते. आता ‘सर्कस’मधूनही ही जोडी धमाल करताना दिसणार आहे. या दोघांमध्येही एक साम्य आहे ती म्हणजे त्यांची कमालीची उर्जा
सिद्धार्थने या आधीही रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेल्या ‘गोलमाल’ चित्रपटात काम केले होते. मात्र रणवीर आणि तो खऱ्या अर्थाने एकत्र आले ते ‘सिम्बा’ या चित्रपटातून. त्यांच्या ‘सर्कस’ या आगामी चित्रपटाची झलक शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आली. त्यावेळी रणवीर आणि तुझे नाते कसे आहे?, असा प्रश्न सिद्धार्थला विचारण्यात आला. यावर वेळ न घालवता सिद्धार्थने म्हटले की, आमची मैत्री आणि नाते जुळले ते रोहित शेट्टीमुळे. ‘कमालीची उर्जा आणि चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्यावर ती भूमिका आपल्यात उतरवून कसे काम करायचे हे मी रणवीरकडून शिकलो. ‘सिम्बा’ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी आम्ही एकत्र विमानाने प्रवास करत होतो तेव्हा आमची पहिली भेट झाली. त्यानंतर चित्रिकरणादरम्यान आमच्यात घट्ट मैत्रीचे नाते निर्माण होत गेले. आमची मैत्री घट्ट होण्यासाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे आम्ही दोघे कितीही दंगा करत असलो तरी रोहित शेट्टीला मात्र आम्ही घाबरतो’, असे मनमोकळेपणाने सिध्दार्थने सांगितले.
हेही वाचा- Video : मंगलाष्टका झाल्या, खांद्यावर उचलून घेतलं अन् पाठकबाईंनी राणादाच्या गळ्यात हार घालत केलं किस; हार्दिक-अक्षयाच्या लग्नातील खास क्षण
रणवीरमध्ये शिकण्याची वृत्ती आहे. तो कितीही मस्तीखोर असला तरी कामाप्रती त्याची निष्ठा फार मोठी आहेे. इतकेच नाही तर रणवीर सिंग एक उत्तम सहकलाकार असल्याचेही सिद्धार्थने सांगितले. हाणामारी आणि विनोदी आशयाची जुगलबंदी असलेल्या ‘सर्कस’ या चित्रपटात रणवीर सिंग पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे ‘गोलमाल’ या चित्रपट मालिकेतील चारही भागांची आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाची आठवण करून देणारा हा चित्रपट आहे. २३ डिसेंबरला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. ‘सर्कस’मध्ये रणवीर सिंगबरोबर जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, सिद्धार्थ जाधव, वरुण शर्मा, विजय पाटकर, सुलभा आर्या, टिकू तलसानिया, वृजेश हिरजी, अश्विनी काळसेकर आणि मुरली शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा- पनवेलच्या खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा धडाका
‘सिम्बा २’ लवकरच येणार…
‘सर्कस’च्या झलक प्रकाशन सोहळ्यात ‘सिम्बा’ या चित्रपटाचा पुढचा भाग अर्थात ‘सिम्बा २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची कबुली दिग्दर्शक रोहित शेट्टीने दिली. सोहळ्याला उपस्थित असलेल्या रणवीर सिंगनेही याला दुजोरा दिला असून हा चित्रपट कधी भेटीला येणार याची उत्सूकता प्रेक्षकांच्या मनात वाढली आहे.