‘कुठलाही नट भूमिका निवडत नाही, भूमिका नटाला निवडते. लहानपणी मला रामानंद सागर यांच्या ‘श्री कृष्णा’ मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारायला मिळाली हे माझे भाग्य आहे, परंतु मी ही भूमिका साकारली त्यामागे माझी मेहनत होती. परमेश्वर आपल्याला दिसेल इतके आपण पुण्यवान नाही. सर्वसामान्य माणसांना त्यांचा कृष्ण कसा होता? याची कल्पना करण्यासाठी मी फक्त एक माध्यम होतो. याची जाणीव मला माझ्या मध्यमवर्गीय संस्कारातून झाली होती’, अशा भावना अभिनेता स्वप्नील जोशी याने पहिल्यावहिल्या ‘मराठी तितुका मेळवावा – विश्व मराठी संमेलन २०२३’मध्ये गुरुवारी  व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध निवेदिका आणि अभिनेत्री दीप्ती भागवत यांनी स्वप्नीलशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘प्रत्येक मराठी नाटक, मालिका, चित्रपट व कलाकृतीवर प्रेम करा. पॉपकॉर्न महाग वाटत असतील तर खाऊ नका, घरूनच जेऊन जा. पण मराठी चित्रपट  चित्रपटगृहातच जाऊन बघा. मराठी मालिकांच्या मागे ठामपणे उभे रहा. मराठी नाटकाला आपण उत्तम प्रतिसाद देतोच. नागरिकांचा रक्तगट हा ए पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह असा असतो. मला वाटते की मराठी माणसाचा रक्तगट हा नाटक आहे. आपल्या रक्तात, संस्कृतीत, सभ्यतेत, जडणघडणीत नाटक आहे. त्यामुळे नाटक हे अजरामर असून चिरतरुण आहे व कायम राहील. पण चित्रपटही मोठा होत असून त्यात वेगवेगळे प्रयोग होत आहेत, तर त्यामागे ठामपणे उभे रहा, असे आवाहन स्वप्नीलने  प्रेक्षकांना केले.

अनेक व्यक्तिरेखांशी अभिनेता म्हणून जुळते. पण स्वभाव, गुणधर्म म्हणून जुळत नाही. त्या व्यक्तिरेखेची विचार करण्याची पद्धत पटत नाही. पण एक अभिनेता म्हणून ती व्यक्तिरेखा सार्थकी नेणे, पूर्णत्व देणे आणि दिग्दर्शकाच्या पसंतीप्रमाणे उभे करणे हे माझे काम आहे आणि मी ते इमानदारीने करीत आहे, असे स्वप्नील म्हणाला.

येत्या १३ जानेवारी रोजी स्वप्नील जोशी परेश मोकाशी दिग्दर्शित व मधुगंधा कुलकर्णी लिखित ‘वाळवी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतील ‘सौरभ’ या भूमिकेला संपूर्णतः छेद देणारी ‘अनिकेत’ ही वेगळी भूमिका ‘वाळवी’ चित्रपटात साकारली असल्याचे, स्वप्नीलने नमुद केले.

फक्त तुझे पाय समोर आहेत

लहानपणी मी श्रीकृष्णाची भूमिका साकारत असताना माझ्यापेक्षा वयाने मोठी असलेले नागरिक माझ्या पाया पडायला यायचे. तेव्हा मला खूप अवघडल्यासारखे वाटायचे आणि मी कोणाला माझ्या पाया पडू द्यायचो नाही. तेव्हा रामानंद सागर मला म्हणाले की, ‘तुला कोणी सांगितले की ते तुझ्या पाया पडत आहेत. ते भगवान श्रीकृष्णाच्याच पाया पडत आहेत, फक्त तुझे पाय समोर आहेत.’ ज्या वयात पालक आपल्या मुलांवर संस्कार करतात, त्या संस्कार होण्याच्या वयात तू संपूर्ण जगावर संस्कार करीत आहेस. हे भान ठेवून भूमिका साकार. माझ्यानमते हे भान भगवान श्रीकृष्ण आणि रामानंद सागर यांनी माझ्याकडून ठेऊन घेतले. जर माझे काम लोकांना आवडले असेल तर ती त्यांची कृपा आहे, असेही स्वप्नील म्हणाला.

मराठीत ओटीटी माध्यम आणत आहे. मराठी भाषेसाठी काही तरी करायला हवे या अनुषंगाने मी माझ्या सहकाऱ्यांसह ‘वन ओटीटी’ या नावाने एक प्रादेशिक ओटीटी माध्यम या वर्षापासून सुरू करीत आहे, त्यात मराठी चित्रपट, मालिका, नाटक, वेबशोज, माहितीपट या सर्व गोष्टी असणार आहेत. या माध्यमातून दर्जेदार मराठी कार्यक्रम, चित्रपट आदी केवळ महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही, तर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही स्वप्नीलने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor swapnil joshi dialogue actor role in cinema mumbai print news ysh