मराठी रंगभूमीवरील एक आगळावेगळा प्रयोग आणि मनाला भिडणारे नाटक म्हणजे अभिनेता दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे या जोडीचे ‘पत्रापत्री’. गेल्या वर्षी १७ मे रोजी रंगभूमीवर दाखल झालेल्या ‘पत्रापत्री’ या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी सायं. ४.३० वाजता ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे रंगणार आहे. हा एक महत्त्वाचा टप्पा असून, रसिक प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे.
मुंबईत एनसीपीए येथे झालेल्या पहिल्या प्रयोगापासून ते अमेरिकेतही १६ प्रयोगांचा अत्यंत यशस्वी दौरा पूर्ण करणारं हे नाटक लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या ‘पत्रापत्री’ या पुस्तकावर आधारित आहे. दोन वृद्ध मित्र, तात्यासाहेब आणि माधवराव, यांच्यातील पत्रव्यवहारावर आधारित हे नाटक हलकीफुलकी मांडणी असलेले प्रभावी भाष्य करणारे आहे.
या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रयोगात केवळ पाच पत्रे सादर केली जातात आणि ती दरवेळी बदलत राहतात. त्यामुळे प्रत्येक प्रयोगात प्रेक्षकांना नवीन अनुभव मिळतो. सध्या नाटकात असलेले एक पत्र इंडियन प्रीमियर लीगवर विनोदी भाष्य करते. क्रिकेटच्या या आकर्षक स्वरूपावर दोन वृद्ध मित्रांचे वेगवेगळे दृष्टिकोन मनोरंजनात्मक पद्धतीने सादर केले जातात, हे विशेष आकर्षण ठरते.
‘पत्रापत्री’ या नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांनी केले आहे. तसेच दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे यांच्या अतुलनीय अभिनयामुळे हे नाटक अधिकच प्रभावी ठरते. या नाटकाचे लेखन व नाट्यरूपांतर नीरज शिरवईकर यांनी केले आहे.