लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः ‘सडक २’ आणि ‘बाटला हाऊस’सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री क्रिसन परेराला खोट्या प्रकरणात शारजामध्ये अडकवल्यानंतर गुन्हे शाखेच्या प्रयत्नामुळे ती भारतात परतली आहे.
आंतरराष्ट्रीय वेब मालिकेत काम मिळवून देण्याच्या नावाखाली अभिनेत्री क्रिसन परेराला शारजाला पाठवून अंमलीपदार्थांच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते. तिला शारजामध्ये अटक झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी वाकोला पोलिसांकडे तक्रार केली. वाकोला पोलिसांनी राजेश दामोदर बोभाटे ऊर्फ रवी ऊर्फ प्रसादराव (४२) व ॲन्थोनी ॲलेक्स पॉल (३४) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींनी शारजामधून क्रिसनला सोडवण्यासाठी एक कोटी आठ लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या कक्ष-१० च्या पोलिसांनी राजेश व पॉल या दोघांना अटक केली होती.
आणखी वाचा-सव्वासात कोटी रुपयांच्या अपहाराप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांना अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हे शाखेने आरोपींना अटक करून तत्काळ केंद्र सरकारमार्फत शारजातील स्थानिक यंत्रणांना याबाबतची माहिती दिली होती. त्यामुळे क्रिसनच्या परतीचा मार्ग मोकळा झाला होता. चौकशीत आरोपीने क्रिसनप्रमाणे ऋषीकेश पांड्या, केन रॉड्रीक्स, क्लेटन रॉड्रीक्स व मोनिशा डिमेलो यांनाही परदेशात पाठवले होते. त्यातील क्रिसन व क्लेटन रॉड्रीक्स यांना शारजा पोलिसांनी अटक केली. या सर्वांच्या कुटुंबियांशी पॉलचा वाद झाला होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्याने या सर्वांना शारजाला पाठवून तस्करीच्या प्रकरणात अडकवले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे.