मुंबई : ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या मंचावर आपली एकांकिका सर्वोत्तम ठरावी, यासाठी कसून तयारीला लागलेल्या युवा नाट्यकर्मींना आपली अभिनयाची बाजू चोख कशी करावी याचे मार्गदर्शन आज ‘रंगसंवाद’च्या माध्यमातून मिळणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक हृषीकेश जोशी यांच्याबरोबर आज, मंगळवार, ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता ‘खास नाट्याभिनय’ या विषयावर वेबसंवाद रंगणार आहे. विशेष म्हणजे ‘लोकसत्ता लोकांकिका’मध्ये सहभागी नसलेल्या होतकरू रंगकर्मींनाही या ‘रंगसंवादा’त सहभागी होऊन अभिनयाचे बारकावे शिकता येतील.
हेही वाचा >>> वायू प्रदूषण रोखण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्वे
एकांकिका स्पर्धेत झटून काम करणाऱ्या आणि भविष्यात अभिनय क्षेत्रात जाण्याच्या उद्देशाने तयारी करणाऱ्या युवा स्पर्धकांना या क्षेत्रातील दोन लोकप्रिय कलाकारांकडून त्यांचे अनुभवी बोल ऐकण्याची संधी या ‘रंगसंवाद’च्या माध्यमातून मिळाली आहे. रंगमंचावरून अभिनयाची सुरुवात करत नाटक, चित्रपट आणि ओटीटी या तिन्ही माध्यमांवर आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि हृषीकेश जोशी यांचे काम, नाट्याभिनयाचे शिक्षण, वाचन या सगळ्यांतून त्यांची स्वत:ची अभिनय शैली विकसित झाली आहे. या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या या दोघांनाही आपल्या मनातील प्रश्न थेट विचारण्याची संधी उदयोन्मुख कलाकारांना मिळणार आहे.