मुंबई : ‘सिनेमाचे जागतिकीकरण आधीच झाले असल्याने कुठल्याही कलात्मक निर्मितीसाठी आर्थिक बळ मिळणे अवघड नाही. परंतु कुठल्याही व्यवस्थेप्रमाणे चित्रपटासारख्या सर्जनशील क्षेत्रातही एका टप्प्यावर आर्थिक नफा मिळतो आहे हे लक्षात आल्यानंतर व्यावसायिक मूल्यांवर अधिक भर द्यायला सुरुवात होते. त्याऐवजी उत्तम आशयाला आर्थिक पाठबळ मिळाल्यास प्रेक्षकही येतील आणि अर्थकारणाची घडीही बसेल. व्यावसायिक हित हे कधीही आशयापेक्षा प्रबळ होता कामा नये, असे परखड मत ख्यातनाम अभिनेते पंकज कपूर यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐंशीच्या दशकांत ‘राख’, ‘एक डॉक्टर की मौत’ यांसारखे कलात्मक चित्रपट आणि ‘करमचंद’, ‘जबान संभाल के’, ‘ऑफिस ऑफिस’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून अमीट ठसा उमटवणारे अभिनेते पंकज कपूर यांच्याशी शनिवारी ‘लोकसत्ता गप्पां’चा कार्यक्रम रंगला. रंगभूमी, दूरदर्शन, ओटीटी अशा विविध माध्यमांतून गाजलेली अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी पंकज कपूर यांची जडणघडण, अभिनेता होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आईवडिलांची प्रतिक्रिया, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील प्रशिक्षणाचा अनुभव, अल्काझींसारख्या गुरूंचे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष रंगभूमीवर, चित्रपट क्षेत्रात काम करताना आलेले विविधांगी अनुभव अशा विषयांवर त्यांना बोलते केले. ‘पंकज कपूर यांनी आजवर अतिशय उत्कट आणि समरसतेने आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका रंगवल्या. त्यांच्या चेहऱ्यापेक्षा त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अशा सर्जनशील, प्रतिभावंत कलावंताशी संवाद साधण्याचा योग ‘लोकसत्ता गप्पा’च्या निमित्ताने जुळून आल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते अभिनेते पंकज कपूर आणि त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या गीतांजली कुलकर्णी या दोघांनाही ‘लोकसत्ता’तर्फे भेटवस्तू देण्यात आल्या.

अभिनेता होण्याच्या निर्णयाच्या मुळाशी कुठेतरी लहानपणापासून आईने बसवलेल्या छोट्या नाटिका, इंग्रजीचे प्राध्यापक असणाऱ्या वडिलांनी शेक्सपिअरपासून अनेक नामवंत जागतिक साहित्यिकांच्या हिंदीतून ऐकवलेल्या कथांचा प्रभाव पडला असावा. मात्र १८व्या वर्षी मी अभिनेताच होणार असा ठाम निर्णय ऐकवल्यानंतर वडिलांनी मला तुझा अभिमान वाटतो, अशा शब्दांत दिलेले प्रोत्साहन आणि ज्या क्षेत्रात जाऊ इच्छितोस त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण गरजेचे आहे, असे सांगत हरतऱ्हेने दिलेला पाठिंबा आयुष्याला दिशा देणारा ठरला, असे कपूर यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. एनएसडीतला प्रवेश आणि अल्काझींनी वैयक्तिक स्तरावर रस घेऊन वेळोवेळी केलेले सहज मार्गदर्शनही कसे मोलाचे ठरले याचे किस्सेही त्यांनी यावेळी ऐकवले. जगात कुठलीही दोन माणसे एकसारखी नसतात, हा त्यांनी दिलेला गुरुमंत्र संपूर्ण अभिनय कारकीर्दीत महत्त्वाचा ठरला, असं सांगत त्यांच्या यशस्वी भूमिकांमागचे इंगित त्यांनी सहज गप्पांच्या ओघात उलगडले.

अतिशय प्रामाणिकपणे आणि मनमोकळेपणाने प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणाऱ्या पंकज कपूर यांनी आपण पहिल्या दिवसापासून आजतागायत सतत शिकत राहण्याच्या वृत्तीतूनच प्रत्येक भूमिका केल्याचे सांगितले. अतिशय रंगतदार अशा या गप्पांच्या मैफलीचे निवेदन कुणाल रेगे यांनी केले.

आशिष शेलार शेवटच्या रांगेत

राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी शेवटच्या रांगेत बसून कार्यक्रम पाहिला. राजकीय नेते नेहमी पहिल्या रांगेत असतात, मात्र शेलार यांनी हा शिरस्ता मोडला. त्यातही त्यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम होता. शेलार यांचे राज्यातील विविध सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांशी संबंध आहेत. त्यामुळे कला विषयक जिव्हाळा यातून त्यांनी दाखवून दिला.