बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने मुंबईतील जुहू येथील तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, जियाची आई, नोकर, सुरक्षारक्षक आणि तिचे तीन मित्र यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. हैदराबादवरून दोन तमिळ सिनेमांसाठी ऑडिशन देऊन आल्यानंतर भरपूर दु:खी होती, असे जियाच्या आईने सांगितले. सध्या जियाकडे कोणत्याही मोठ्या हिंदी किंवा तमिळ चित्रपटाची ऑफर नव्हती. तसेच कोणत्याही जाहिरातीमध्ये जिया गेले काही दिवस दिसली नाही. त्यामुळे जिया मानसिक तणावात होती, असेही तिच्या आईने सांगितले. 
जियाच्या आत्महत्येमुळे बीग बींसह बॉलिवूड हळहळले
जियाची आई म्हणाली, “ज्या अभिनेत्रीच्या चित्रपट क्षेत्रातील करिअरची सुरूवात अमिताभ बच्चन यांच्या सारख्या बड्या अभिनेत्या सोबत काम करून होते, अशा अभिनेत्रीला आतापर्यंत सुपरस्टार झाले पाहिजे होते असे जिया म्हणायची.”
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या मार्च २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘नि:शब्द’ चित्रपटातून जियाने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केली होती. जियाच्या  आत्महत्येमुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ‘नि:शब्द’ चित्रपटातून जियाला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर जिया खानच्या आत्महत्येची बातमी अतिशय धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.   ‘हाऊसफुल्ल’ हा जियाचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटातही जियाने छोटीशी भूमिका साकारली होती.