कर्जत शहरापासूनही दूर जंगलात असलेल्या ‘जामुरंग’ नावाच्या गावाने बुधवारी चांगलीच धमाल, लगबग अनुभवली. एरवी चित्रपटात घडणाऱ्या गोष्टी अचानकपणे त्यांच्या गावात घडू लागल्या. मांडव उभा राहिला, गावातल्या एकमेव आरोग्य उपकेंद्राच्या हालचाली वेगाने वाढल्या. हा सगळा जामानिमा होता तो बॉलीवूड अभिनेत्री काजोलच्या आगमनाचा. एरवी आरोग्य उपकेंद्राबाहेर लावलेल्या भल्यामोठय़ा फलकावरच्या स्वच्छतेच्या सगळ्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गावातील यच्चयावत महिलांनी गालातल्या गालात हसून सांगितलं, आता हात स्वच्छ धुणार.. ‘काजोल’ ताईने सांगितलेय म्हणून..
गेली तीन वर्षे बॉलीवूड अभिनेत्री काजोल ‘लाइफबॉय’च्या स्वच्छता अभियानाची सदिच्छा राजदूत म्हणून काम पाहते आहे. संयुक्त राष्ट्रसंघात या अभियानाची मांडणी करण्यापासून ते आता गावांमध्ये महिलांना हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व सांगेपर्यंत काजोल या अभियानला प्रामाणिकपणे चिकटून आहे. ‘जामुरंग’च्या आरोग्य उपकेंद्रात बसलेल्या काजोलने चित्रपट आणि या कंपनीच्या निमित्ताने तिच्याकडून होत असलेले सामाजिक कार्य सध्या तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तिचा पुनरागमनातला चित्रपट म्हणून ज्या ‘दिलवाले’ची हवा केली गेली त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार खुद्द शाहरुखने केली आहे. मात्र अभिनेत्री म्हणून उलट आपल्याला लोकांकडून, इंडस्ट्रीकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्याचे काजोलचे म्हणणे आहे. ‘मुलांसाठी मी कारकीर्दीला अर्धविराम दिला होता. माझी दोन्ही मुले इतकी चांगली आहेत की, त्यांनी माझी काम करायची इच्छा एवढय़ा लहान वयातही समजून घेतली आहे. तुला चित्रपट करायचे आहेत आणखी काही करायचे आहे तू खुशाल कर’, अशी परवानगीही मुलांनी मला दिली. आणि माझ्या कामाचा त्यांना अभिमान वाटतो, अशी कौतुकाची पावतीही जोडली आहे, त्यामुळे दुहेरी आनंदाने काम सुरू केल्याचे काजोलने सांगितले.
बॉलीवूडमध्ये एका ठरावीक काळाच्या गॅपनंतर पुन्हा कारकीर्द घडवणे अवघड असते, हे तिला मान्य आहे. ‘दिलवाले’ने मला जोरदार सुरुवात करून दिली आहे. आता माझी चित्रपटांची गाडी थांबणार नाही, असे सांगणाऱ्या काजोलने आपल्याला वर्षांला चार चित्रपट करायची घाई नाही. त्यामुळे घर, चित्रपट आणि मला आवडेल त्या पद्धतीचे सामाजिक कार्य या तिन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळता येणार असल्याचे सांगितले. प्रत्येक गावात जाऊन हात स्वच्छ धुवा, असे मी सांगू शकत नाही. निदान जिथे जाईन तिथे काजोलने सांगितले आहे म्हणून तरी लोक हात स्वच्छ धुवायचे कष्ट घेतील, असेही ती मनमोकळपणे सांगते. काजोल गावात आल्याने आपल्या गावाचे नाव टीव्हीवर येईल, या कल्पनेने गावकरी सुखावले आहेत. आरोग्य केंद्रातील सेविकांनी काजोलबरोबरचा एक दिवस मोबाइलमधील कॅ मेऱ्यात बंद केला आहे आणि सध्या तरी ‘जामुरंग’पासून सुरुवात करून पुढच्या ४०० गावांमध्ये ‘हात स्वच्छ धुवा’ या संदेशाचा उद्घोष होणार आहे.

 

Story img Loader