मराठी अभिनेत्री आणि माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरला जिवे मारण्याची धमकी देणारे फोन कॉल्स आले आहेत. यानंतर आता या अभिनेत्रीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ANI या वृत्तसंस्थेने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. क्रांती रेडकरला पाकिस्तानी क्रमांकावरुन ठार करण्याच्या धमक्या आणि अश्लील संदेश पाठवण्यात आल्याचंही एएनआयने म्हटलं आहे.
पाकिस्तानी क्रमांकावरुन आल्या धमक्या
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार क्रांती रेडकरला ठार मारण्याच्या धमक्या या पाकिस्तानी क्रमांकावरुन आल्या आहेत. तसंच अश्लील मेसेजही पाठवण्यात आले आहेत. या सगळ्या संदर्भात क्रांतीने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसंच क्रांतीने या सगळ्या प्रकरणी स्क्रिन शॉट पोस्ट केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद फडणवीस आणि मुंबई पोलिसांना टॅग करत या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृ्ष्टीत काम करणारी अभिनेत्री आहे. महाविकास आघाडी सरकार असताना तिचे पती समीर वानखेडे एनसीबीचे अधिकारी होते. त्यांनी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक केली होती. ज्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी जवळपास रोज पत्रकार परिषदा घेऊन समीर वानखेडेंवर आरोप केले होते. त्यावेळी क्रांती रेडकर पती समीर वानखेडेंची बाजू घेत त्यांच्या आरोपांना उत्तर देत होती.
क्रांती रेडकरने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. समीर वानखेडेंशी तिचा विवाह झाला आहे. आता तिला जी ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्याप्रकरणी तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.